आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Freedom Struggle News In Marathi, Osmanabad, Divya Marathi

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच मुक्तिदिन, जामगावात ध्वजारोहणाची जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतरही निझामाच्या जोखडामध्ये बंदिस्त असलेल्या मराठवाड्यातील जनतेला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे मराठवाड्यात मुक्तिदिन साजरा केला जातो. मात्र, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये विलीन झालेल्या काही गावांनी या दिनाचे स्वागत केले नव्हते. यानिमित्ताने मुक्तिसंग्राम दिनाचे स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील जामगावमध्ये जय्यत तयारी झाली आहे.

स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील काही गावे मराठवाड्यात होती. या गावांनी निझामाविरोधात प्रखर लढा दलिा होता. निझामाच्या जुलमी कारभाराला कंटाळलेल्या या भागातील ५२ गावांतील नागरिक जून १९४८ मध्ये एकत्र आले आणि त्यांनी मुक्तापूर स्वराज्य नावाचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. काँग्रेसचे तत्कालीन नेते फुलचंद गांधी, बाबासाहेब परांजपे, चंद्रशेखर बाजपेयी या स्वातंत्र्यसेनानींच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार सुरू झाला. ही ५२ गावे आता माढा, उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ तालुक्यात आहेत. माढा तालुक्यातील जामगाव ही मुक्तापूर स्वराज्याची राजधानी होती. जामगावचे विठ्ठल पाटील यांच्या चिरेबंदी वाड्यामध्ये मंत्रालय होते. स्वतंत्र मंत्रिमंडळ, पोलिस ठाणी, सैनिकांचा ताफा असलेेले हे राज्य ३ महिने सुरू होते. मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतरच हे राज्य अखंड भारतामध्ये वलिीन करण्यात आले. या राज्याच्या पाऊलखुणा असलेल्या वाड्यामध्ये या वर्षी प्रथमच म्हणजे स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतर १७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी जामगावकरांनी जय्यत तयारी केली आहे. दिवंगत स्वातंत्र्यसैिनक विठ्ठल पाटील यांच्या वाड्यात सकाळी उस्मानाबाद जनता बँकेचे कार्यकारी संचालक वसंतराव नागदे, इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमासाठी जामगावसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित राहतील. या निमित्ताने गावकऱ्यांना मेजवानी देण्यात येणार आहे.

अन् इतिहास जिवंत झाला : १९४८ ला स्वातंत्र्य मिळूनही या भागात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नव्हता. नव्या पिढीला फारशी माहिती नसल्यामुळे या रोमांचकारी इतिहासाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, इतिहासतज्ज्ञ डॉ.सतीश कदम यांनी "असे झुंजलो आम्ही’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा लढा पुढे आणला आहे. त्यामध्ये मुक्तापूर स्वराज्यची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वाचून गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

"दिव्य मराठी'ची दखल
महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटलांचे प्रतिसरकार चर्चेत होते. मात्र, मुक्तापूर स्वराज्यची पहलिी ओळख "दिव्य मराठी'ने सप्टेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्राला करून दिली. तेव्हापासून या परिसरात नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची ओढ निर्माण झाली होती.