आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Have Become Governor Due To My Guru Mhaisekar C.Vidyasagar Rao

आपल्या आशीर्वादानेच राज्यपाल,सी. विद्यासागर राव यांची गुरू म्हैसेकरांप्रती कृतज्ञ भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ‘आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राज्यपाल झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे’ या गुरू प्रा. डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या उद्गारावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या ‘आपल्या आशीर्वादामुळेच मी राज्यपाल झालो’ या कृतज्ञतेच्या उद्गाराने बुधवारी सायंकाळी म्हैसेकरांच्या घरातील वातावरण भारावून गेले. प्रसंग होता गो. रा. म्हैसेकर व सी. विद्यासागर राव या गुरू-शिष्याच्या ४९ वर्षांनंतर झालेल्या भेटीचा. श्रेयासाठी जिवाचा आटापिटा करणा-या राजकारण्यांच्या गर्दीत आपल्या मोठेपणाचे श्रेय गुरूला अर्पण करणा-या राज्यपाल विद्यासागर यांच्या मनाचा मोठेपणाही या भेटीत दिसून आला.

राज्यपाल विद्यासागर गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुधवारी दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. सायंकाळी त्यांनी आपले गुरू गो. रा. म्हैसेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी आपल्या मनाची दारे मोकळी केली.

आंध्र प्रदेशातून दोन वेळा खासदार व ३ वेळा आमदार झाल्याचेही त्यांनी गुरू म्हैसेकरांना नम्रतापूर्वक सांगितले. गुरूसमोर राज्यपालांनी मनमोकळी चर्चा केली. त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते; परंतु त्या वेळच्या नियमाप्रमाणे त्यांना वय कमी असल्याने वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला नाही. म्हैसेकरांचे व राव यांचे दूरचे नातेसंबंध आहेत. त्या संबंधातून एक वर्ष त्यांनी नांदेडला शिकावे व नंतर वैद्यकीय शिक्षणाकडे जावे, असा प्रस्ताव आला. त्यानुसार ते १९६३ मध्ये शिक्षणासाठी आले. यशवंत महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. त्या वेळी गो. रा. म्हैसेकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते; परंतु येथील वातावरण पाहून राव यांनी वैद्यकीय शिक्षणाचा नाद सोडला व याच महाविद्यालयातून बी. एस्सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
जून १९६६ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयातून २३ फेब्रुवारी १९६७ रोजी त्यांनी टी. सी. काढली. महाविद्यालय प्रवेशाची सर्व कागदपत्रे विद्यमान प्राचार्य एन. व्ही. कल्याणकर यांनी राज्यपालांना दिली.

तब्बल ३० मिनिटे भेट
राज्यपाल सायंकाळी ४.४० वाजता म्हैसेकर यांच्या निवासस्थानी आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रा. गो. रा. म्हैसेकर ९४ वर्षांचे आहेत. त्यांना ऐकायला येत नाही, बोलताही येत नाही. ते पाटीवर लिहून आपल्या भावना व्यक्त करतात. गुरू-शिष्यातही असाच संवाद झाला. या वेळी यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य कल्याणकर, माजी प्राचार्य वर्दाचार्युलू, ढेंगळे आदी उपस्थित होते. गुुरूच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून राज्यपाल विद्यासागर राव सायंकाळी ५.१० मिनिटांनी गुरुद्वारात दर्शनासाठी रवाना झाले.