उमरखेड - ‘स्वातंत्र्यानंतरकाँग्रेसनेच सत्ता भोगली आहे, तरीही जगातील गरीब देशांच्या यादीत भारताचे नाव आहे, तर बेरोजगारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. खनिज संपत्तीने नटलेल्या राज्यात गरीब जनता असणे खेदाची बाब आहे. सत्तेची चावी भाजपच्या हाती आल्यास महाराष्ट्राला महान राज्य बनवू’, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.
भाजपचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भ्रष्टाचार, घोटाळे, दंगे यांसारख्या अनेक गोष्टी करूनही आघाडी मंत्र्यांना क्लीन िचट कशी मिळते? आमची सत्ता आल्यास चौकशी समिती नेमून या गोष्टींचा भंडाफोड केल्याशिवाय राहणार नाही आमच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागल्यास मंत्रिमंडळात ठेवणार नाही. शेतकरी आत्महत्येवर संवेदनाहीन झालेली सरकार उखडून टाकून भाजपची सत्ता आणा. राज्यात परिवर्तनाची वेळ आली आहे. मागील पंधरा वर्षांपासून ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती यापुढे करू नका, असे आवाहनही या वेळी राजनाथ यांनी केले.
उमरखेडजवळ असलेल्या इसापूर धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा असतो; तरीही सिंचन क्षेत्र कमीच आहे. २००६ आणि २०१३ मध्ये झालेल्या गारपिटीचा निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. आजतागायत उमरखेडात घडलेल्या दंगली, अत्याचार दीड हजारांपेक्षा जास्त जणांवर अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपच्या काळात असे प्रकार कदापि होऊ देणार नाही. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा उमरखेड विधानसभेत घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
महायुतीवर राजनाथसिंहांचे सौम्य भाष्य : जागावाटपावरून महायुतीच्या ताटातुटीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सौम्य भाष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील नामांकित व्यक्ती होते, असा निर्वाळा त्यांनी दिला. मी आणि भाजप सदैव आम्ही त्यांचा सन्मान करू, असेही ते म्हणाले. महायुती तुटली तरीही बाळासाहेबांना मानणाऱ्यांमध्ये भाजप असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांनी केला मराठीतून नमस्कार
व्यासपीठावरआगमन होताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘उमरखेडवासीयांना माझा नमस्कार’, असे मराठीतून बोलून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मात्र त्यांनी हिंदीतूनच भाषण केले. मराठीचा मुद्दा शिवसेनेकडून हिरावून मतदारांना आकर्षित करण्याचा हा फंडा तर नाही ना, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.