आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त 65 लाख, फिर्याद केवळ 50 हजारांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - उदगीरहून मुंबईला नेत असताना पुणे येथे लुटण्यात आलेली 65 लाख 32 हजार 500 रुपयांची बेहिशेबी रक्कम लातूर पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांकडे केवळ 50 हजार रुपयेच लुटले गेल्याची फिर्याद दाखल झाल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

दोन एप्रिल रोजी उदगीरहून सिद्धिविनायक कुरिअरचे चालक सुदेश गिरी यांनी आपले नोकर सचिन कुंभार आणि सुनील शेलकर यांच्याकडे ही रक्कम दोन बॅगांत भरून विश्व ट्रॅव्हल्सने उदगीरहून मुंबईला पाठवत होते. त्यावेळी गाडी पुण्यातील हिंजवडी पसिरात आली असता चोरट्यांनी गाडी अडवून कुंभार व शेलकर यांच्या ताब्यातील बॅगा पळवल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचे धागेदोरे शोधण्यासाठी तेथील पोलिसांनी लातूरच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार लातूर पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांचे सहकारी विनोद चिलमे, लक्ष्मण राख यांनी तपासाला गती दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांना माहिती मिळाली, की लातुरातील वैभवनगरात राहणारा सूरज राऊत यात मुख्यआरोपी आहे.. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला असता 65 लाख 32 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली. ही कारवाई सुरू असतानाच पुणे पोलिसांचे पथक लातुरात येऊन धडकले आणि ते आरोपीला घेऊन पुण्याला रवाना झाले.

रक्कम लुटली गेल्यानंतर पोलिसांनी बॅगा घेऊन जाणार्‍या कुंभार व शेलकर यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यातून राऊतवर संशय बळावला. परिणामी बॅगा घेऊन जाणारे व राऊत यांच्यात संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊतने या दोघांकडूनच बॅगा कशा पळवल्या? अन्य प्रवाशांना लुटणार्‍यांचा काहीच त्रास कसा झाला नाही, आदी प्रश्नही यातून पुढे येत आहेत.

कागदपत्रे बाळगणे आवश्यक : रोख रक्कम घेऊन जाताना काही निर्बंध आहेत. त्यानुसार 50 हजारच जवळ ठेवता येतात. यापेक्षा जास्तीची रक्कम नेताना त्यासंदर्भातील व्यवहाराची कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. उदगीरहून मुंबईल नेण्यात येणार्‍या रकमेचा हिशेबच नाही.

गळ्याला कोयता लावून लुटली रक्कम
लातूर येथील सराफ सुदेश अशोक गिरी (36) यांनी चार एप्रिल रोजी हिंजवडी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गिरी यांचे कर्मचारी सचिन व सुनील हे सिद्धिविनायक कुरिअरचे पार्सल टपाल व रोख रक्कम 50 हजार रुपयांच्या दोन बॅग्ज घेऊन तीन एप्रिल रोजी लातूरहून मुंबईला जात होते. त्या वेळी डांगे चौक ते रावेत ब्रिजदरम्यान त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्ससमोर अनोळखी कारचालकाने त्यांची कार आडवी लावली. त्यानंतर कुरिअर कंपनीच्या कर्मचार्‍यांना तुम्ही महिलेची छेड काढली, असे सांगत त्यांच्या गळ्याला कोयता लावून चार भामट्यांनी बॅग लंपास केली होती.

निवडणुकीशी पैशांचा संबंध नाही
पुणे येथील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ए. टी. वाघमाळे यांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 65 लाख रक्कम वसूल करून लातूर, उदगीर येथे इतर चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, निवडणुकीशी या पैशांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम अशाप्रकारे मुंबईला कोणत्या कारणासाठी नेली जात होती हे गुलदस्त्यातच आहे.

रक्कम हवाल्याची असण्याची शक्यता
सापडलेली रक्कम मोठी असल्याने आयकर खाते चौकशी करेल. त्याचे डिटेल तपासले जातील. तपास पुणे पोलिसांकडे असल्याने हे काम त्यांचे आहे, ही रक्कम बेहिशेबी असून हवाल्याची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. - बी. जी. गायकर, पोलिस अधीक्षक, लातूर

बॅगेत नेमकी किती रक्कम होती याबाबत संभ्रम
पुणे - लातूर येथील सराफाचे कर्मचारी लातूर-मुंबईदरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्सला अज्ञात चौघांनी चिंचवडजवळील डांगे चौक ते रावेत ब्रिजदरम्यान गाडी आडवी लावून त्यांची पैशांची बॅग पळवून नेली होती. सराफाने याप्रकरणी 50 हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दिली. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी गुरुवारी उदगीर येथून याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 65 लाखांची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे बॅगेत नेमकी किती रक्कम होती हे संशयास्पद आहे.