आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 कोटींचे वाळू साहित्य जप्त; पैठण तालुक्यातील वाळू पट्ट्यावर धाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नायगाव-मायगाव तसेच मुंगी (ता. शेवगाव) येथील गोदापात्रातून अवैधरीत्या शेकडो ब्रास वाळूचा उपसा करणार्‍यांवर रविवारी पैठण महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत पाच कोटींची वाळू व साहित्य जप्त केले. यामध्ये दहा ट्रक, चार बोटी, 4 पोकलेन तसेच 100 ब्रास वाळूचा समावेश आहे.

मुंगी परिसरात वाळू तस्कर कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा करत असल्याची माहिती महसूल यंत्रणेला होती. मात्र, राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास प्रशासन धजावत नव्हते. परंतु रविवारी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी दीक्षित गेडाम यांना याची माहिती दिली. गेडाम यांनी तहसीलदार संजय पवार, तलाठी डी. डी. क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा नेऊन अवैध वाळू उपशावर धाड टाकली. या वेळी गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. वाळू उपसण्यासाठी अत्याधुनिक बोटी, पोकलेन, जेसीबी व वाळू भरण्यासाठी काही ट्रक उभ्या होत्या. प्रशासनाने हे सर्व साहित्य जप्त केले. ट्रक, जेसीबी व 100 ब्रास वाळूची किंमत पाच कोटींच्या घरात आहे.

उशिरापर्यंत कारवाई सुरू
रविवारी दुपारी 12 वाजता सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, प्रशासनाने वाळू उपसण्यासाठी लागणारे साहित्य, ट्रक व पावती पुस्तके जप्त केली आहेत.

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
मुंगी परिसरातील वाळू पट्ट्यातून वाळू माफियांनी बेसुमार वाळू उपसा सुरू ठेवला असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आजच्या कारवाईत पैठण तालुक्यातील अधिकार्‍यांचा समावेश होता. यामध्ये शेवगाव महसूल यंत्रणेचा समावेश नव्हता.