आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, पोलिसाच्या अंगावर चढवला टिप्पर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन (जालना) - अवैध वाळू उपशाला अभय दिल्याप्रकरणी आठवडाभरापूर्वी भोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्यासह एक मंडळ अधिकारी दोन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तालुक्यात अवैध वाळू उपसाविरुद्ध महसूल प्रशासनाने धडाकेबाज मोहीम सुरू केली असताना वाळू माफियांची मुजोरी समोर येत आहे. अशाच एका घटनेत शुक्रवारी संध्याकाळी वाळू माफियांनी थेट पोलिसांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील भोकरदन-जालना रोडवर बरंजळा फाट्याजवळ हा प्रकार घडला. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे टिप्पर पकडून पुढील कारवाईसाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. पाेलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत दुचाकीवरून उडी घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. भोकरदन तालुका हा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा गृहतालुका आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तालुक्यातच वाळू माफियांचा हैदोस वाढल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.  

शुक्रवारी संध्याकाळी तालुक्यातील नळणीच्या पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळू भरून टिप्पर निघाले असल्याची माहिती भोकरदनचे एसडीएम हरिश्चंद्र गवळी यांना मिळाली. नळणी चौफुलीवर दोन वाळूचे टिप्पर एसडीएम गवळी त्यांच्या पथकाने पकडले. टिप्पर भोकरदनला घेऊन येण्यासाठी पोलिस कर्मचारी गणेश पायघन, जाधव नळणी चौफुलीवर गेले. या वेळी उपविभागीय अधिकारी गवळी, मंडळ अधिकारी दिघे, तलाठी शिंदे, मणियार उपस्थित होते. आदेशाप्रमाणे पकडलेले टिप्पर भोकरदन तहसील कार्यालयाकडे घेऊन येण्यासाठी पोलिस कर्मचारी पायघन यांनी मोटरसायकल समोर घेऊन भोकरदनकडे निघाले. दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या टिप्परचालकाने त्याच्या मालकाशी संपर्क केला. मालकाने पळून ये असे सांगितल्यावरून टिप्परचा (एमएच २१ एक्स ८२८४) चालक पायघन यांच्या मोटारसायकलचा आेव्हरटेक करून पुढे गेला. टिप्परचालक पळून जात आहे हे लक्षात येताच पायघन यांनी टिप्पर चालकाचा पाठलाग करत टिप्पर चालकाला थांबण्यास सांगितले. ‘बाजूला व्हा नाही, तर गाडी अंगावर घालीन’, असे म्हणत टिप्पर चालकाने जिवे मारण्याच्या उद्देशाने टिप्पर त्यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. पायघन यांनी मोटारसायकलवरून उडी मारून जीव वाचवला. यानंतर टिप्परचालक वेगात निघून केला. पायघन यांनी पकडलेला एक टिप्पर (एमएच २१ एक्स ८७८७) भोकरदन तहसील कार्यालयात आणून कोतवाल शेख अय्युब यांच्या ताब्यात दिला. पोलिस कर्मचारी गणेश पायघन यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक मालकाविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. शिरसाठ करत आहेत. घडलेल्या प्रकारात गुन्हा दाखल झाल्यावर घटनास्थळी भोकरदन जालना रोडवर वरील बरंजळा फाटा येथे डीवायएसपी ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक गोकुळसिंग बुंदेले यांनी पाहणी केली. 

पोलिसांत तक्रार दिली 
मोटारसायकलवरून उडी मारल्याने मला किरकोळ मार लागला. त्या टिप्पर चालक मालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चालक मालक कोण अद्याप कळाले नाही. तपास सुरू आहे. गणेशपायघन, पोलिस कर्मचारी 

कठोर कारवाईचे आदेश 
सात एप्रिल रोजी पथकाने माहिती मिळताच नळणी चौफुलीवर दोन गाड्या पकडल्या. पथकातील पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून एक टिप्पर फरार झाला. त्या टिप्पर चालक मालकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हरिश्चंद्रगवळी, एसडीएम, भोकरदन. 

११ लाखांचा दंड वसूल 
तहसील कार्यालयाकडून प्राप्त माहितीप्रमाणे भोकरदन तालुक्यात गेल्या आर्थिक वर्षात - एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारी फक्त ३२ वाहने पकडून ११ लाख ८५ हजार दंड वसूल केला सात वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...