आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - स्थानिक अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लातुरातील मजगेनगरात छापा मारून बुधवारी जवळपास 10 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पो. निरीक्षक बी. जी. मिसाळ यांनी दिली.

जयनारायण कुसाराम खंडेलवाल हा पान मटेरियलचा ठोक व्यापारी आहे. तो आपल्या मजगेनगरातील अपार्टमेंटमध्ये बाबा, रत्ना या सुगंधी तंबाखूबरोबरच सुवासिक सुपारीची साठवणूक करून बाजारात आणून त्याची विक्री करत होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला लागताच त्यांनी पोलिसांची मदत घेऊन दुपारी एक वाजेच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी त्याच्याकडे मोठा माल मिळून आला. त्यामुळे पथकातील कर्मचार्‍यांनाही मोजता मोजता नाकीनऊ आले. हा माल दहा लाखांच्या पुढे असल्याच्या निष्कर्षापर्यंत अधिकारी पोहोचले होते. दुपारी एक वाजेपासून सुरू असलेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

मराठवाड्यातील ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.

18 जुलैला घातली बंदी : सुगंधी तंबाखू आरोग्याला अपायकारक असल्याने राज्य सरकारने 18 जुलै रोजी महाराष्ट्रात मावा, खर्रा, बार आदी प्रकारची सुपारी सुगंधी तंबाखूत मिसळून विक्री करण्यावर बंदी आणली आहे. हे पदार्थ आरोग्यास अत्यंत अपायकारक असल्याने त्यांच्या प्रतिकूल परिणामामुळे जनुकीय रचनेमध्येही फेरबदल होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शासनाने समाज स्वास्थ्यासाठी अशा पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासनाने बैठक
घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली होती. तरीही त्याची विक्री सुरूच होती.

15 हजारांवर टपर्‍या : लातूर जिल्ह्यात सुमारे 15 हजारांवर पानटपर्‍या असून शहरात पानमसाले व तंबाखू विक्री करणारे 25 घाऊक तर 100 किरकोळ विक्रेते आहेत. किराणा दुकानातूनही पान मटेरियलची विक्री होते. त्यामुळे अशा उत्पादनाची विक्री करणार्‍यांची नेमकी संख्या किती हे अस्पष्ट आहे, परंतु पानटपरीचालक संघटनेने नव्याने नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार 15 दिवसांत शहरात एक हजारावर नोंदणी झाली आहे.

मनुष्यबळाचा अभाव
लातूर एफडीएकडे मनुष्यबळ अतिशय तोकडे आहे. अन्न निरीक्षकांचे पाच पैकी एक पद रिक्त आहे. त्यातच एका अन्न निरीक्षकाकडेच सहायक आयुक्तांचा अतिरिक्त पदभार असल्याने कोणत्याच कामाला योग्य न्याय देता येत नाही, असा युक्तिवाद सदर विभागाकडून केला जात आहे. त्यातच पोलिसांचे विशेष सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले जाते.

थेट तक्रारी कराव्यात
बंदीनंतर प्रथमच दहा लाखांचा माल जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने मर्यादा पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आमच्याकडे थेट तक्रारी कराव्यात. त्यामुळे कारवाई करण्यात मदत होईल.’ दयानंद पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, लातूर

‘चोरी चोरी चुपके चुपके’
सुगंधी तंबाखूवर बंदी आणण्यात आली असली तरी त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. उलट ही बंदी इतके दिवस कागदावरच राहिल्याने ती टपरीचालकांच्या पथ्यावर पडली होती. बंदीचे कारण सांगून 10 रुपयांची सुपारी 15 रुपयांत विकली जात होती. आता पहिल्यांदाच मोठी कारवाई झाल्याने टपरीचालकांवर फास आवळला जाणार आहे. सुगंधी तंबाखूच्या बाजारपेठेत बाबा, रत्ना या ब्रँडचा मोठा दबदबा आहे. ठोक व्यापारी हे डबे 30 ते 50 रुपये वाढवून टपरीचालकांना विकत आहेत. ब्रँडेड कंपन्यांची नक्कल करून विक्री करणार्‍या सुगंधी तंबाखूच्या कंपन्याही कार्यरत आहेत. ही नक्कल इतकी हुबेहूब आहे, की असली व नकलीतला फरक ओळखणे अवघड आहे.त्यामुळे कारवाईची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे.

सहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
सुगंधी तंबाखू विक्री केल्यास तीन ते सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय कारवाईत किती रुपयांचा माल जप्त करण्यात आला त्यावरून एक ते पाच लाखांचा दंड करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.