आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीतून अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍या मोटारी जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाकळी राजेराय - खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय व दासावाडी या दोन गावांना पाणीपुरवठा करणार्‍या दासावाडीचे धरण कोरडे पडले असताना ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊनही धरणातील विहिरीतून अवैध पाणी उपसा करत असलेल्या शेतकर्‍यांविरुद्ध ग्रामपंचायतीने कारवाई करत विहिरीवरील विद्युत मोटारी मंगळवारी जप्त केल्या.

दासावाडी धरण यंदा पावसाअभावी कोरडे पडले आहे. त्यामुळे या दोन गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच धरणाखाली असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरींच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. यंदा पावसाची स्थिती पाहता उन्हाळ्यात पाणीप्रश्न मोठे स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरीच्या परिसरातील पाणी उपसा बंद करण्याच्या सूचना शेतकर्‍यांना दिल्या होत्या. परंतु काही शेतकरी ग्रामपंचायतीच्या सूचनेला न जुमानता सर्रास पाणी उपसा करत होते. त्यामुळे या गावांना सुरळीत पाणीपुरवठा होत नव्हता. परिणामी टाकळी गावातील नागरिकांना तीन-चार दिवसांआड तर दासावाडी येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून किंवा परिसरातील विहिरीवरून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे या गावातील महिलांबरोबर आबालवृद्धांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीची विहीर पाणी उपसा करण्यासाठी धोकादायक असून थेट विहिरीवरून पाणी भरणे नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे.

सभेत उठले होते वादंग
मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍यावर कारवाई करण्यात यावी, याविषयी मोठे वादंग उठले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीशेजारील उपसा होत असलेल्या विहिरीवरील विद्युत पंप जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरपंच तिलकचंद मेठी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा पर्यवेक्षक नईम पटेल, नरेश कुचे, दिनेश परमेश्वरे, रावसाहेब जाधव यांनी उपसा होत असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटारी जप्त केल्या.