आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Work In Goddess Tuljabhavani Trust, Devotee\'s Donated Precious Things Disappered

तुळजाभवानी संस्थानात अपहार, भक्तांचे मौल्यवान दान ठेकेदारांनी लाटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी म्हणून समस्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात मंदिराच्या मुख्य गाभा-यातील तीन दानपेट्यांमध्ये रोख रक्कम व भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंचा जवळपास 1800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे खळबळजनक सत्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तपासातून समोर येत आहे.


हा गैरव्यवहार सन 1991-92 ते 2009-10 या 20 वर्षांच्या कालावधीतील आहे. सीआयडीचा अहवाल अपर पोलिस महासंचालकांकडे सोपवण्यात आला असून गैरव्यवहार झालेल्या काळात संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष राहिलेल्या जिल्हाधिका-यांचीही आता चौकशी होणार आहे. तुळजाभवानीच्या तुळजाभवानी संस्थानात अपहार दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोप-यातून लाखो भाविक येतात. श्रद्धेनुसार प्रत्येक भाविक देवीचरणी दानपेटीत रोख रक्कम, सोने-चांदी व इतर मौल्यवान वस्तू दान म्हणून अर्पण करतात. 1970-1983 पर्यंत या दानपेटींचा नोंदणीकृत ठेकेदारांच्या उपस्थितीत लिलाव होत होता. त्यानंतर 1984 ते 91 या काळात सिंहासन दानपेटींचे व्यवस्थापन मंदिर संस्थानकडे होते. या काळात मंदिर संस्थानचे उत्पन्न ठेकेदारांना मिळणा-या कमाईपेक्षा कित्येक पटीने अधिक होते. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अजूनही याकडे कुणी गांभीर्याने पाहिलेले नाही.

ठेकेदार तेच, लिलावाचा बनाव!
20 वर्षांतील सिंहासन पेटीचा लिलाव घेणा-या ठेकेदारांची नावे पाहता दोन ते तीन गट एकत्रित येऊन आलटून-पालटून बोली बोलून पेट्या घेत होते. या वेळी एकाच्या नावाने लिलाव करून इतरांनी सहभागीदार म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यानंतर सिंहासन पेटीतून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेत.

विश्वस्तांचेही पाठबळ
या गैरव्यवहारास मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांचेही पाठबळ आहे.घोटाळ्याचा आकडा दीड हजार कोटींपेक्षा अधिक असून दोषींवर कडक कारवाईची गरज आहे.
किशोर गंगणे, तक्रारदार व अध्यक्ष, पूजारी मंडळ.


दानपेट्यांच्या लिलावात 1800 कोटींचा घोटाळा
महिनाभरापूर्वी चौकशीचा प्राथमिक अहवाल सीआयडीच्या अपर पोलिस महासंचालकांना प्राप्त झाला आहे. यात गैरव्यवहाराची स्पष्ट आकडेवारी नसली तरी अहवालातील नोंदींचा अभ्यास केला तर हा गैरव्यवहार 1800 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. या 20 वर्षांच्या कालावधीत मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्यरत असणा-या 22 जिल्हाधिका-यांची नावे या अहवालात आहेत.


प्रकरण काय? : लिलावातील अटी व शर्तीनुसार सिंहासन दानपेटीत जमा रोख रक्कम ठेकेदारास व मौल्यवान वस्तू संस्थानकडे जमा करणे आवश्यक होते; परंतु ठेकेदारांनी मौल्यवान वस्तू हडप केल्याच, शिवाय लिलावापोटी बोली लावलेली रक्कमही जमा केली नाही. याविरुद्ध पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी 21 एप्रिल 2010 रोजी लातूर धर्मादाय आयुक्त सुनील कोतवाल यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार सीआयडीकडे तपास सोपवला होता.


बिंग फुटले
० घोटाळा झालेल्या 20 वर्षांच्या कालावधीत मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष राहिलेल्या 22 जिल्हाधिका-यांची चौकशी होण्याची शक्यता.
० ठेकेदार आणि संस्थान कर्मचा-यांच्या संगनमताचे बिंग फुटण्याची शक्यता
० मंदिर संस्थानच्या आजी-माजी अध्यक्षांसह विश्वस्तांचीही चौकशी होणार


1984 ते 1991 दानपेट्यांचे व्यवस्थापन होते संस्थानकडे
1991 ते 2010 लिलाव पद्धतीच्या काळात घोटाळ्याचा कालावधी
2010 ते पुढे दानपेट्यांचे व्यवस्थापन पुन्हा संस्थानकडे दहा वर्षांत संस्थानकडे आले फक्त 46 ग्रॅम सोने


मात्र, 1999 ते 2009 या काळातील नोंदींनुसार देवस्थानकडे केवळ 46 ग्रॅम, 700 मिलिग्रॅम सोने व 512 ग्रॅम, 500 मिलिग्रॅम चांदी जमा झालेली आहे. यावरून काढलेल्या निष्कर्षानुसार दरवर्षी देवस्थानचे पाच कोटींचे नुकसान होत असल्याचे अहवालात नमूद आहे. देवीस अर्पण केलेले दागिने विशिष्ट धातूचे आहेत असे नाही. यात रत्नजडित, हिरे, माणिक अशा मौल्यवान वस्तूही असायच्या.


तपासणीदरम्यान एक महिन्यात आले 441 ग्रॅम सोने
उत्पन्नाचा आकडा तपासण्यासाठी तक्रारदाराच्या अर्जानुसार धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून 19 मार्च 2010 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास सिंहासन दानपेटी सीलबंद करण्यात आली. त्यानंतर 32 दिवसांनी पेटी उघडली. तेव्हा पेटीमध्ये रोख 23 लाख 13 हजार, 441 ग्रॅम सोने व सहा हजार 171 ग्रॅम चांदी, असा 31 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज जमा झाला होता.