आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Gross Domestic Income Latur District Is Leader

दरडोई उत्पन्नात लातूरची आघाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- अवघ्या तीस वर्षांपूर्वी जिल्हा निर्मितीपासून सुरू झालेली विकासाची गाथा कायम ठेवत लातूरने मराठवाड्यात औरंगाबादनंतर दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. 2012 तील महाराष्‍ट्र इकॉनॉमिक सर्व्हेनुसार औरंगाबादचे दरडोई उत्पन्न 84 हजार 295, तर लातूरचे 81 हजार 557 आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेला लातूर तालुका 15 ऑगस्ट 1982 रोजी जिल्हा झाला. तेव्हापासून स्वतंत्र ओळख मिळालेल्या लातूरची प्रगतिपथाकडे घोडदौड सुरूच आहे. त्यामुळे उस्मानाबाद या मूळ जिल्ह्याला लातूरने केव्हाच मागे टाकले असून, आपल्या बरोबरीने जिल्हा झालेल्या जालन्यासमोरही त्याने विकासाचा आदर्श घालून दिला आहे. लातूरमध्ये चारही बाजूंनी प्रवेश करताना दिसणारे भव्य रस्ते, हॉटेल्स, विविध कंपन्यांचे शोरूम आणि देखण्या इमारती पाहता विकसित लातूरची साक्ष मनाला पटते. तसे पाहता राजकीय नेतृत्व, शिक्षणाचा पॅटर्न विकसित करणारे गाव, राज्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ आणि भूकंपाचा भीषण धक्का सहन केलेला जिल्हा म्हणूनही लातूरची सर्वदूर ओळख आहेच.

विभागात औरंगाबादनंतर लातूर आणि नांदेड हे दोन जिल्हे महत्त्वाचे मानले जातात. त्यातून लातूर पुढे की नांदेड, अशी चर्चा नेहमीच रंगत आली आहे. त्यात दोन्ही जिल्ह्यांकडे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने क्रमांक दोनची स्पर्धा आणखी तीव्र झाल्याचे सर्वश्रुत आहे. लातूरच्या विकासाचा चढता आलेख मांडताना येथील नेतृत्वाला जसे श्रेय जाते तद्वतच व्यापारी, शेतकरी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील धुरीण आणि विकास चळवळीतील संघटनांचे प्रयत्नही मोजावे लागतील. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना परिवहन, महावितरण, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, जात पडताळणी, माहिती, क्रीडा आदी जवळपास वीस विभागीय कार्यालये लातुरात सुरू झाली.

लातूरकरांनी आपला शिक्षण पॅटर्न राज्यभर निर्माण केला. गुणवत्तेची ही खाण पाहून लातुरात उच्च शिक्षणात मैलाचा दगड ठरणारी दोन वैद्यकीय महाविद्यालये आणि सहा अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली. याचबरोबर उद्योग, सहकार, व्यापार, कला-संस्कृती, राजकरण आदी सर्वच क्षेत्रांत लातूरने एक स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे.

क्षेत्रफळ कमी, तरीही आघाडी
मराठवाड्यात औरंगाबाद (10 हजार 100 चौ. कि.मी.), बीड (10 हजार 615 चौ.कि.मी.), नांदेड (10 हजार 332 चौ. कि.मी.), जालना (7 हजार 612 चौ.कि.मी.) आणि उस्मानाबाद (7 हजार 512 चौ.कि.मी.) या जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरचे (7 हजार 157 चौ.कि.मी.) क्षेत्रफळ फारच कमी आहे. त्यामुळे लातूरच्या वाट्याला धरणे, नद्या, शेती आणि वनसंपदा कमी आली आहे. तरीही लातूरने प्रतिकूल परिस्थितीतही विकासात विभागात दुसरा क्रमांक गाठला आहे. सगळ्यात कमी क्षेत्रफळ हिंगोली जिल्ह्याचे असून (4 हजार 5226 चौ.कि.मी.) त्यानंतर परभणीचा (6 हजार 250 चौ.कि.मी.) क्रमांक लागतो.

आर्थिक सुबत्तेचे आणखी एक परिमाण
माणसाचे उत्पन्न वाढले की त्याची जीवनशैली बदलते. त्यातून भौतिक सुविधांकडे कल वाढतो. परिणामी शानशौक आला. असाच काहीसा बदल लातूरकरांत दिसून येत आहे. या जिल्ह्यात 20 लाखांपासून ते पाच कोटी रुपये किंमत असलेल्या महागड्या गाड्यांचे अनेक जण धनी आहेत. परंतु आपल्या ऐपतीनुसार वाहन खरेदी करण्यात सर्वसामान्यही कमी नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्या खरेदी करण्यात मराठवाड्यात औरंगाबादनंतर लातूरचाच क्रमांक लागतो.

सामाजिक भानही कायम
लातूरकरांनी आपली आर्थिक प्रगती साधत असताना सामाजिक भानही कायम ठेवले आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या कमी करण्यात हा जिल्हा विभागात दुस-या क्रमांकावर आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, याचे महत्त्व पटल्याने साक्षरतेत औरंगाबादनंतर दुस-या क्रमांकावर लातूरच आहे.