आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increasing Prices Of Dollar Effected On Mahalaxmi

वाढत्या डॉलरची साक्षात महालक्ष्मीलाही बसणार झळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - रुपयाची घसरण अन् डॉलरच्या दबदब्याची झळ गौरीच्या सणाला बसली असून सर्वाधिक पसंती असलेल्या चिनी खेळण्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी, तर भारतीय खेळणीच्या दरात 15 टक्के वाढ झाली आहे. तथापि, या भाववाढीचा ग्राहकांवर मोठा परिणाम झाला नसून ते उत्साहाने खरेदी करीत आहेत.

गौरीच्या स्थापनेनंतर त्यांच्यापुढे खेळण्याची आरास मांडली जाते. ती अधिकाधिक देखणी अन् आकर्षक करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. त्यांच्या या हौसेला चार चांद लावण्यासाठी बाजार खेळण्यांनी सजतो. या पार्श्वभूमीवर बाजारात खेळणी, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्लास्टिक फुलांच्या माळा विक्रीस आल्या आहेत. चिनी वस्तूंना सर्वाधिक मागणी आहे. मखर सजवटीसाठी लेझर, एलईडी लायटिंगचे शेकडो नमुने उपलब्ध आहेत. संसकृतीला साजेसे आकार, धार्मिक प्रतीके अन् पाना-फुलांचे कोंदण लाभलेल्या इलेक्ट्रॉनिक माळा पाहताक्षणी सर्वांचे लक्ष वेधत आहेत. 30 ते 250 रुपयांपर्यंत प्रतिमाळेची किंमत आहे. मल्टी कलर एलईडी बल्व, पणती, मेणबत्ती, शिवपिंडी उपलब्ध आहेत. मॅजिक वॉटर बॉल, पाण्याच्या कारंजात विविधरंगी प्रकाश फेकणारे मॅजिक फाउंटेन, रिव्हॉल्व्हिंग बॉल, हवनातील अग्नी दाखवणारे कुंड हे आकर्षण ठरले आहे.

डॉलरची किंमत वाढल्याने चिनी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किमतीत 20 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते भरत चांडक यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉलरच्या दरवाढीनुसार किमती वाढत असल्याने भावात अस्थिरता असल्याचेही ते म्हणाले. चिनी खेळणीत पक्षी, प्राणी, फुलांच्या माळा, फरचे प्राणी, मोटारी, विमाने, जहाज उपलब्ध आहेत. हुबेहूबपणा अन् कौशल्याची जोड असलेल्या या खेळण्यांना ग्राहकांची अधिक पसंती असल्याचे विक्रेते चंद्रकांत मद्रेवार यांनी सांगितले. भारतीय बनावटीच्या खेळणीत प्लास्टिक अन् उलनच्या खेळणी, विविध हार, लक्ष्मींचे दागिने, सजावटीचे पडदे, झुंबर, तोरण याचा अंतर्भाव आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, चिनी माती अन् पारंपरिक खेळणीही आली असून त्यांनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे.