आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indications Of Another Controversy Over Water Of Ujani Dam

पाणीबाणी : लातूरला थेंबभरही पाणी देणार नाही, उजनीचेही पाणी पेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून उस्मानाबादपर्यंत आलेल्या उजनी पाणीपुरवठा योजनेवर १६ एमएलडीचे पंप बसवून ८ एमएलडी पाणी नेण्यासाठी लातूरकरांचा खटाटोप सुरू झाला आहे. मात्र, या योजनेतून लातूरला थेंबभरही पाणी देणार नाही, अशी ठाम भूमिका उस्मानाबादकरांनी घेतली आहे. उस्मानाबादच्या वाट्याचे पाणी लातूरला दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडीपाठोपाठ उजनी योजनेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद शहराला ११४ किलोमीटरवरील उजनी धरणातून २००७ मध्ये १६ एमएलडी पाणीपुरवठा मंजूर करण्यात आली असून ही योजना २०१३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, लोकसंख्येच्या मागणीनुसार पालिकेने योजनेवर ८ एमएलडीचे पंप बसविले आहेत. त्यामुळे शहराला दररोज ८ एमएलडी पाणी मिळते. भविष्यातील गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. मात्र, नेमकी हीच संधी साधून लातूर महापालिकेने या योजनेतून आठ एमएलडी पाणी उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उस्मानाबादपासून लातूरपर्यंत आठ एमएलडी पाणी नेण्यासाठी योजनेवरील पंप वाढविण्याची तयारी लातूरने दाखविली आहे. म्हणजे योजनेच्या क्षमतेनुसार १६ एमएलडी पाणी उस्मानाबादपर्यंत आणून ८ एमएलडी अतिरिक्त पाणी लातूर शहरासाठी नेण्यात येणार आहे. त्यासाठी लातूर महापालिकेने मजीप्रकडून आराखडा तयार करून घेतला असून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, उस्मानाबाद पालिकेने हा प्रस्ताव कदापिही मान्य करणार नाही, अशी थेट भूमिका घेतली आहे. त्यामुळे या विषयावरून दोन जिल्ह्यांत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी मानवी धर्माची शिकवण असली तरी दुसऱ्याच्या वाट्याचे पाणी पळवून कसे चालेल, असा प्रश्न नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. लातूरकरांनी उजनीतून स्वतंत्र योजना राबवावी, उस्मानाबादवरून पाणी दिल्यास भविष्यात तुळजापूर, ढोकी, तेर, येडशी या गावांसह छोट्या खेड्यांना पाणीटंचाईला
तोंड द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

लातूरकर नव्या स्रोताच्या शोधात
लातूर शहराला मांजरा (धनेगाव) धरणातून दोन वेगवेगळ्या ८० एमएलडीच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. अन्य दोन प्रकल्पांतून २६ एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, मांजरा धरणातील पाणी संपत आल्याने महापालिका नव्या स्रोताच्या शोधात आहे. ६ लाख लोकसंख्येच्या या शहराला प्रतिमाणसी १३० लिटरप्रमाणे दररोज सुमारे ८० एमएलडी पाण्याची गरज आहे. टंचाईच्या काळानुसार किमान ५० एमएलडी पाण्याची मागणी आहे. सध्या केवळ २० एमएलडी पाण्यावर शहराची तहान भागविली जात आहे. मांजरा धरणातील पाणी आणखी ४ महिने पुरेल एवढेच आहे.

लातूरकरांचा प्रस्ताव
प्रस्तावानुसार उजनी धरणावरून उस्मानाबादपर्यंत आलेल्या योजनेवर म्हणजे उजनी धरण, हातलाई पंप हाऊस आणि तेरणा फिल्टर येथे आणखी ८ एमएलडीचे पंप बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद येथील तेरणा फिल्टवरून उपळामार्गे ढोकी, कोल्हेगाव, शिराढोण अशी नवीन योजना करण्यात येणार आहे. लातूर शहरासाठी धनेगाव धरणातून पूर्वीपासूनच योजना कार्यान्वित आहे. ही योजना शिराढोणच्या शिवारातून जाते. उस्मानाबादहून जाणाऱ्या योजनेचे पाणी शिराढोणपर्यंत नेऊन लातूरला जाणाऱ्या योजनेला जोडण्यात येणार आहे.

लातूरकरांचा प्रस्ताव
प्रस्तावानुसार उजनी धरणावरून उस्मानाबादपर्यंत आलेल्या योजनेवर म्हणजे उजनी धरण, हातलाई पंप हाऊस आणि तेरणा फिल्टर येथे आणखी ८ एमएलडीचे पंप बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद येथील तेरणा फिल्टवरून उपळामार्गे ढोकी, कोल्हेगाव, शिराढोण अशी नवीन योजना करण्यात येणार आहे. लातूर शहरासाठी धनेगाव धरणातून पूर्वीपासूनच योजना कार्यान्वित आहे. ही योजना शिराढोणच्या शिवारातून जाते. उस्मानाबादहून जाणाऱ्या योजनेचे पाणी शिराढोणपर्यंत नेऊन लातूरला जाणाऱ्या योजनेला जोडण्यात येणार आहे.

उस्मानाबादेतही माणसंच
आम्हाला भविष्यात तुळजापूरसह परिसरातील गावांसाठी योजनेची क्षमता वाढवावी लागणार आहे. त्यामुळे या योजनेवरून लातूरला एक थेंबही पाणी देणार नाही. लातूरला माणसं राहतात, त्यांना पाण्याची गरज आहे, तशीच माणसं उस्मानाबादेत राहतात. त्यांनाही पाण्याची गरज आहे, याचा शासनाने विचार करावा.
मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष

..तर आत्मदहन करू
उस्मानाबाद शहराला पाणी आणण्यासाठी आम्ही प्रचंड संघर्ष केला आहे. मात्र, ऐन दुष्काळात आमच्या हक्काचे पाणी कुणी नेत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. प्रसंगी आत्मदहन करू.
अमित शिंदे, माजी नगराध्यक्ष