आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Industralist Come Together On Drought; Giving 970 Villages Water Tank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्‍काळी मदतीसाठी उद्योजक एकत्र ;970 गावांना देणार पाण्‍याची टाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्योजकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हा प्रशासनाला कशी मदत करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. प्रत्येक गावात पाच हजार लिटरची एक सिंटेक्स टाकी देण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात 970 गावांत टाक्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या केवळ 44 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे महाराष्‍ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळात नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असतानाच उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक झाली. यात सिंटेक्स टाक्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात तरतूद केली आहे. मात्र, या कामात प्रशासनाला मदत म्हणून या टाक्या पुरवण्यासाठी उद्योजकांनी तयारी दाखवली. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार या टाक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्हाधिका-यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम आदींची उपस्थिती होती.
पाण्याची टाकीच का?
जिल्ह्यात सध्या 145 गावे आणि वाड्यांवर 201 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावात पाण्याचा टँकर पोहोचल्यानंतर तो रिकामा कोठे करायचा, असा प्रश्न ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनासमोर नेहमी पडतो. त्यामुळे टँकरचा खर्च, वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची नासाडी होते. शिवाय खेपाही कमी होतात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक गावात सिंटेक्स टाकी ठेवून त्यात टँकर रिकामे करण्याची योजना जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती.
गरजेनुसार मागणी करणार
सध्या ज्या गावात टॅँकर सुरू आहे तेथे सुरुवातीला या टाक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्व टाक्या एकदाच मागवण्यापेक्षा गरजेनुसार त्यांची मागणी नोंदवली जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांकडे रीतसर मागणी केली जाणार आहे.'
श्याम देशपांडे, जिल्हाधिकारी, जालना
यांचा पुढाकार : राजुरी स्टीलचे डी.बी. सोनी, कालिका स्टीलचे अरुण अग्रवाल, माउली स्टीलचे डॉ.एस.बी. अजमेरा, किशोर अग्रवाल, अविनाश देशपांडे, जी.आर. जाजू, नरेंद्र अग्रवाल.