आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात अवकाळी पाऊस; वादळी पावसात वीज कोसळून महिला ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर\\नळदुर्ग- जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याला सोमवारी (दि. ८) अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून सिंदफळ येथे महिला ठार झाली, तर चिकुंद्रा शिवारात बैल दगावला.    

लक्ष्मी किसन चौगुले (५५, रा. सारोळा, ता. तुळजापूर) आणि अंकुश शेटीबा मंडवळे हे शेळ्या चारण्याकरिता सिंदफळ शिवारात गेले होते. या वेळी दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा कडकडाट होऊन वीज कोसळल्याने लक्ष्मी किसन चौगुले यांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी सत्यभामा चौगुले यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसऱ्या घटनेत तालुक्यातीलच चिकुंद्रा येथे झाडाखाली बांधलेल्या लक्ष्मण गरड यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. लक्ष्मण गरड यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बैल जोडी बांधली होती. यातील एका बैलावर वीज कोसळून त्याचा जागीच  मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. उस्मानाबाद शहरातही ३.४५ वाजेच्या सुमारास हलक्या पावसाने हजेरी लावली, तर उशिरापर्यंत ढगांची गर्जना 
सुरूच होती.

हिंगोलीत ढगांच्या गडगडाटासह रिमझिम
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह सोमवारी दुपारी ५ च्या सुमारास रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर उकाडा झाल्यावर या पावसामुळे उकाडा कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली. शहरासह बासंबा, एमआयडीसी, देवाळा, नर्सी नामदेव, कळमनुरी, औंढा आदी भागांतही पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातही हलक्या सरी
लातूर जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. हलक्या स्वरूपाचा १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. लातूर शहरासह परिसरात  बेमोसमी पावसाचा सडाका आला. औसा, निटूर आदी भागातही पावसाचा शिडकावा झाला. थंड वारे सुटल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात आठवडाभरात कमीअधिक प्रमाणात तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा ऊस, उन्हाळी भुईमूग, मका आदी पिकांना फायदा होत असला तरी फळवर्गीय पिकांना मात्र फटका बसत आहे.
बातम्या आणखी आहेत...