आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हा बँक : २० जण एसआयटीसमोर हजर, १४२ कोटी रुपयांचो घोटाळा प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली अाहे. या प्रकरणात माजी संचालक लाभधारक संस्थांच्या संचालकांसह १०१ जणांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. अटकेच्या भीतीने अनेक संचालक अज्ञातवासात गेले असून मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २० जणांनी एसआयटीसमोर हजेरी लावली होती. दरम्यान, एसआयटीने जबाब नोंदवले आहेत. चौकशीसाठी आलेल्यांपैकी कुणाला अटक केली नाही.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात एकूण १३१ प्रकरणांमध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद अाहेत. या प्रकरणांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना दिले होते. त्यानंतर एसआयटीने रिक्स प्रो या खासगी कंपनीच्या मदतीने प्रकरणाचा तपास केला असून यात अनेक गुन्ह्यांमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे. एसआयटीने जिल्हा बँकेच्या संचालकांसह १०१ जणांना सोमवारी नोटिसा बजावल्या आहेत. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी आमदार सुरेश धस, राजाभाऊ मुंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, रमेश आडसकर, बदामराव पंडित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा, वडवणी नगर पंचायतीच्या भाजपच्या नगराध्यक्षा मंगल मुंडे यांच्यासह मातब्बरांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालय, परळी, अंबाजोगाईत पोलिस ठाण्यात उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते.

डेंटलहाॅस्पिटलने भरली कर्जाची रक्कम
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकृषी कर्जवाटपात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सोलापूर येथील डेंटल हाॅस्पिटलला काेटी ५० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, कारवाईच्या हालचाली सुरू करताच हाॅस्पिटल प्रशासनाने जिल्हा बँकेत व्याजासह कर्जाची परतफेड केली.

चौकशी सुरू
नोटिसादेऊन त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली आहे. अनेक माजी संचालकांनी नोटिसा घेतलेल्या नाहीत. दहा जण उपस्थित राहिले असून अजून काही जण हजर होतील. -अनिल पारसकर, पोलिसअधीक्षक

माजी उपाध्यक्षांसाह अनेक हजर
सायंकाळपर्यंत बँकेचे माजी उपाध्यक्ष दशरथ वनवे, गणपत बनसोडे, रामकृष्ण कांदे, बाळासाहेब जगताप, पंडित माने, जालिंदर पिसाळ, अॅड. किर्दत यांनी बीडमध्ये, तर परळी येथील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लाभधारक असलेल्या जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे संचालक नंदकिशोर तोतला, एकनाथ मुळे, माधव सानप, बाबूराव जाधव, वैजनाथ जगतकर या पाच संचालकांनी परळीत हजेरी लावली. त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...