आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspection Team Drought Is Hearing Problems Of Farmer

परभणीतील चार गावांतून ऐकली गाऱ्हाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - केंद्रीय पथकाने परळीमार्गे परभणी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.१२) सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रवेश केला. आपल्या मॅरेथॉन दौऱ्यात गंगाखेड, परभणी व सेलू तालुक्यातील चार गावांतील पीक परिस्थितीची पाहणी करताना विदारक स्थिती प्रत्यक्ष पाहताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडिमार सहन केला.
शेतातच काही पिकणार नसल्याने समस्यांचा डोंगर समोर असताना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे, अशा स्वरूपाच्या हृदयद्रावक भावना या पथकाने ऐकल्या. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव, रुमणा, परभणी तालुक्यातील दैठणा व सेलू तालुक्यातील चिकलठाणा या चार गावांना केंद्रीय पथकाने भेट दिली. कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग यांच्यासह सुरेंद्रसिंग, ए.के.सिंग, पवनकुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेषत: चारही गावे मुख्य मार्गावरची असल्याने पथकास पाहणी करताना अडचणी आल्या नाहीत.
सोयाबीन काढून पाहिले असता त्याची वाढच झालेली नाही. पाने जळून गेलेली तर टिचभर शेंडा हिरवा असल्याचे पाहून या पथकाला पीक परिस्थितीची पूर्ण स्थितीच डोळ्यासमोर आली. आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारीअधिकारी बी.टी. कदम यांच्यासह कृषी विभागासह महसूलचे अधिकारी या दौऱ्यात सहभागी होते. जिल्ह्यात जूननंतर पाऊसच झालेला नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाचे उत्पादनच ५० टक्क्यांवर घटणार असल्याने विदारक स्थिती आहे. त्यांच्या व्यथा एेकून घेतल्यानंतर हे पथक सुन्न झाले. राघवेंद्र सिंग यांनी शेतकऱ्यांकडून त्यांच्या समस्या एेकल्या. रुमणा येथे माणिक बाबूराव सोळुंके यांच्या शेतात पाहणी केली.
जनावरांनाही पाणी नाही
दैठणा येथील दिगंबर कच्छवे या शेतकऱ्याने तर तीन वर्षे निसर्गाच्या संकटाशी तोंड देताना जीव मेटाकुटीला आल्याचे सांगितले. २५ रुपयांना कडब्याची एक पेंडी घ्यावी लागतीय, जनावरांना प्यायला पाणीच नाही. आता सरकारनंच काही तरी करावं. नसता गावं सोडूनच जाण्याची येळ आलीय बघा, या शब्दांत परिस्थिती मांडली.