लातूर- केंद्रीय पथकाने मंगळवारी रात्री आठ वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शिवली गावामध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्रीय पथकातील केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे ए. के. सिंग यांच्यासमोर शिवली गावातील शेतकऱ्यांनी पावसाअभावी झालेल्या नुकसानाबाबत आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी पथकासोबत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, फलोत्पादन संचालक सुदाम आडसूळ, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, औसा तालुक्याचे तहसीलदार व इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बुधवारी सकाळी पथक लातूर, रेणापूर तालुक्यातील गावांना भेटी देणार आहे. सकाळी आठ वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे पथकातील सदस्यांची भेट घेणार आहेत.