आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, पैसे घेऊन तिकिटे वाटल्‍याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सर्व जागांवर उमेदवार मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या आणि काँग्रेससमोर आव्हान उभे करणाऱ्या भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. चाकूरच्या काही कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष मेघराज बाहेतींनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.  

लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद तशी अत्यल्प. त्यातही आजपर्यंत काँग्रेससोबत अंतर्गत समझोता करणारा पक्ष ही भाजपची प्रतिमा. त्यामुळे भाजप या जिल्ह्यात वाढू शकला नव्हता. मात्र, केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपकडे सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. त्याबरोबर नवा-जुना असा वादही सुरू झाला आहे.
 
या वेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती आली. पक्षाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी सोपवून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राजकीय तडजोडी करत उमेदवाऱ्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या उपऱ्यांना तिकिटे मिळाली. त्याचा जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे. निवडणुकीच्या प्रचारात ही धुसफूस सुरूच होती. मात्र, निवडणुका होईपर्यंत संयम पाळण्याचा निरोप त्यांना देण्यात आला होता.

  
दोनच दिवसांत धुसफूस : लातूरमध्ये गुरुवारी मतदान पार पडले. शनिवारीच नेतेमंडळी मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर स्थानिक पातळीवरचे भाजपतील अंतर्गत मतभेद उघडे पडले. शनिवारी तर चाकूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी लातूर रोड येथे पत्रकार परिषद आयोजित करून ही धुसफूस खरी ठरवली.
 
त्यात मनोज बिराजदार, बसवराज नीला, कृष्णा मुंडे, माधव खांडेकर, लक्ष्मण खरटमोल, भरत गुमे, मोहन पाटील, पांडुरंग कोते यांचा समावेश होता. दरम्यान, याबाबत भाजपच्या नेत्यांनी या आरोपांचा इन्कार केला. आरोप करणारी मंडळी फारशी दखलपात्र नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तूर्त अधिकृतपणे यावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  

पैसे घेऊन तिकिटे वाटली  
मनोज बिराजदार म्हणाले, जुन्या निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकिटे बहाल करण्यात आली. तालुकाध्यक्षांनी तर पैसे घेऊन तिकिटे  वाटली आहेत, तर रणजित मुंढे यांनी मी भाजपचाच प्रचार केला अाहे. तरीही आपले निलंबन करण्यात आले. ते चुकीचे असून वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे रणजित मुंडे यांनी सांगितले, तर काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्यांनाच भाजपने बोलावून तिकिटे दिल्याचा आरोप बसवराज नीला यांनी केला. मोहन पाटील यांनी निवेदनात म्हटले, मी सध्या भाजपचा राजीनामा दिला आहे. तरीही मला निलंबनाची नोटीस कशी पाठवू शकतात? मी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...