आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचा माल हडपणाऱ्या दुकानांची 24 तासांत चौकशी करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कोट्यधीश शेतकऱ्यांना गरीब शेतकरी दाखवून परस्पर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य हडप करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी चोवीस तासांत करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सोमवारी(दि.२७)  तहसीलदारांना दिले आहेत.  
 
तहसीलदारांनी शहरासह ग्रामीण भागातील दुकानांची चौकशी करून चोवीस तासांत अहवाल सादर करावा, असे अादेश बजावण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने रविवारच्या अंकात ‘शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा योजना रेशन दुकानदारांच्या घशात, कोट्यधीशांना गरीब दाखवून कोट्यवधींचे धान्य उचलले’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी  हे आदेश बजावले आहेत.    
 
शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे, अशा १४ जिल्ह्यांत ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ रुपये प्रतिकिलो गहू, ३ रुपये प्रतिकिलो तांदूळ देण्यात येतो. माणशी ५ किलोप्रमाणे दरमहा या धान्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना या योजनेची माहितीच नाही.
 
त्याचा गैरफायदा उचलत स्वस्त धान्य दुकानदारांनी हे धान्य शेतकऱ्यांच्या परस्पर उचलून त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये शहरी भागातील प्रतिष्ठित मंडळी असल्याने मात्र त्यांना योजनेची माहितीही नसल्याने त्यंाच्या नावावर आलेले धान्य दुकानदारांनी परस्पर हडप केले. प्रतिष्ठित कुटंुबांत २०-२० वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणले गेलेले नाही. मात्र, त्यांच्या नावावर माल उचलण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. 
 
हा खळबळजनक प्रकार ‘दिव्य मराठी’ने रविवारी पुराव्यासह प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पुरवठा विभाग जागा झाला आहे. सुरुवातीला अशा लोकांची यादी दाखवा, मग कारवाई करू, अशी भूमिका घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यांनी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र सोमवारी तातडीने याप्रकरणी चौकशीचे आदेश काढले आहेत. सोमवारी यासंदर्भात तातडीचे आदेश काढण्यात आले असून ‘दिव्य मराठी’तील वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. 

मुद्देनिहाय चौकशी करा   
पुरवठा अधिकाऱ्यांनी उस्मानाबादच्या तहसीलदारांना दिलेल्या अादेशात म्हटले आहे की, दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे अवलोकन केले असता उस्मानाबाद तालुक्यातील धान्यवाटपाबाबत गंभीर स्वरूपाचे मुद्दे नमूद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थींनाच धान्य वाटप होत आहे किंवा कसे, याबाबत या बातमीद्वारे शंका उपस्थित करण्यात आली आहे. सदर बाब गंभीर स्वरूपाची आहे.
 
त्यानुषंगाने सदर वर्तमानपत्राच्या कात्रणाची प्रत यासोबत जोडण्यात येत असून, सदर चौकशी पत्र मिळाल्यापासून २४ तासांच्या आत वर्तमानपत्रातील नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने मुद्देनिहाय चौकशी करून चौकशी अहवाल तत्काळ निम्नस्वाक्षरित यांच्यासमक्ष सादर करावा. प्रकरणात विलंब टाळावा, अन्यथा विलंबाची जबाबदारी आपल्यावर निश्चित करून पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल, याची नोंद घ्यावी. 
बातम्या आणखी आहेत...