लातूर - लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील चार तरुण इराकमध्ये अडकले आहेत. चौघांनीही आपल्या नातेवाइकांशी संपर्क करून बसरा येथे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र, ज्या कंपनीत ते काम करतात त्या कंपनीचे लोक त्यांचा पासपोर्ट परत करत नाहीत. तुम्हीच काहीतरी करून आम्हाला बाहेर काढा, अशा विनवण्या ते नातेवाइकांकडे करत आहेत.
कर्नाटक सीमेवर असलेल्या हत्तरगा येथील बालाजी भोसले, शिराढोण येथील प्रमोद भोसले, अंबुलगा येथील नितीन कांबळे आणि ज्ञानेश्वर भोसले हे 25 ते 28 वर्षे वयाचे चौघे जण सात महिन्यांपूर्वी इराकला गेले आहेत. इराकच्या बसरा या शहरात असलेल्या एका आॅइल कंपनीत ते मजूर म्हणून काम करतात. अल्पशिक्षित असलेल्या या तरुणांचा हा परदेशी जाण्याचा पहिलाच अनुभव आहे. मधल्या काळात ते सातत्याने संपर्कात होते. गेल्या काही दिवसांपासून इराकमध्ये यादवी सुरू झाल्यानंतरही त्यांचा दोन दिवसांआड संपर्क होत आहे. मात्र, ते सातत्याने स्वत:ची सुटका करावी, अशी मागणी करत आहेत. स्थानिक कंपनीचे लोक त्यांचे पासपोर्ट परत करीत नाहीत, असे ते सांगत आहेत. भारतातील सरकारकडे आमची कैफियत पोहोचवा आणि आमच्या सुटकेसाठी काहीतरी करा. येथे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. युद्ध सुरू आहे, असे ते नातेवाइकांना सांगत आहेत. दरम्यान, कासारशिरसी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन भांगे यांनी संबंधित गावात पोलिसांना पाठवून त्यांच्या नातेवाइकांना धीर देण्याचे काम केले आहे.
जिल्हा प्रशासन अनभिज्ञ
लातूर जिल्ह्यातील कुणी इराकमध्ये अडकून पडले आहेत काय याची विचारणा केली असता लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कसलीच माहिती उपलब्ध झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले की, आम्हाला कुणीही संपर्क केलेला नाही. पोलिस प्रशासनाकडे सर्व माहिती आहे. मात्र, त्याचे पुढे नक्की काय करायचे हे त्यांना माहीत नाही.
छायाचित्र : ISIS चे शस्त्रसज्ज दहशतवाद्यांचे संग्रहित छायाचित्र