आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी दानपेटी गैरव्यवहाराची फेरचौकशी, दीड महिन्यापासून CIDच्या पथकाचा तळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - श्री तुळजाभवानी देवीच्या दान पेट्यांवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांसह त्यांना मदत करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची फेरचौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी दीड महिन्यापासून तुळजापुरात ठाण मांडून आहेत. दानपेटी गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वी ४२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला असला तरी फेरचौकशीत आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.   

श्री. तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटीत विश्वस्त, ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी संगनमताने केलेल्या गैरव्यवहारावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने यापूर्वी शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणाच्या चाैकशी अहवालात मंदिर संस्थानशी संबंधित तत्कालीन ४२ अधिकाऱ्यांवर विश्वासघात, अपहार, फसवणूक, खोटे रेकॉर्ड बनवणे, संगनमताने  कट रचणे आदी गुन्ह्यांची नोंद करण्याची शिफारस केली आहे.  सुमारे ७ कोटी १९ लाखांची अफरातफर या अहवालात दाखवण्यात आली होती. 
 
हिंदू जनजागरण समितीने दानपेट्यांत अपहार करणाऱ्यांवर व त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शपथपत्र देताना शासनाने सीअायडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे न्यायालयाला सांगितले होते, त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. मात्र, यासंदर्भात सीआयडीचे अधीक्षक शंकर केगार यांनी चाैकशीच्या वृत्ताला दुजाेरा दिला अाहे, तर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे दिल्ली येथे कॉन्फरन्ससाठी गेल्याने त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही.    
 
तक्रारीनंतर बिंग फुटले  
मंदिरात तीन दानपेट्या असताना ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे पेट्यांची संख्या सातवर नेली. दानपेट्यांचा लिलाव, कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडून होणारे दुर्लक्ष, हा सगळा प्रकार लक्षात घेता भ्रष्टाचार होत असल्याचा संशय आल्याने श्री. तुळजाभवानी पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे, अजय गणपत पुजारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लातूरच्या धर्मदाय सहआयुक्तांकडे केली होती.
 
त्यांच्या तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाचा अहवाल दिल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दानपेट्यांची लिलाव पद्धत बंद करून या प्रकरणाचा गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला. दाखल तक्रार अर्जाची दखल घेऊन याप्रकरणी १९९९ ते २०१० या कालावधीतील दानपेटी लिलावाची सीआयडी चौकशी सुरू झाली.    
    
कर्मचाऱ्यांचे जवाब
सीआयडीचे अधीक्षक शंकर केगार यांनी जानेवारीत फेरचौकशी सुरू केली अाहे. निवडणुकीमुळे १५ दिवसांपासून तपास बंद असला तरी अाता पुन्हा ते पथकासह दाखल होणारेत. मंदिर संस्थानच्या कार्यालयात त्यांनी संस्थानशी संबंधित कर्मचारी व काही अधिकाऱ्यांचे जवाब घेतलेत.  
 
वेळकाढू धोरण   
सीआयडीच्या डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी चौकशी करून गृहविभागाला अहवाल सादर केला अाहे. अाता संबंधितांवर कारवाई अपेक्षित असताना शासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले जात आहे -किशोर गंगणे, तक्रारदार, तुळजापूर. 
बातम्या आणखी आहेत...