आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यावर असताना अधिकारी- कर्मचाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन; दिरंगाई भोवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर -  नांदूर - मधमेश्वर जलद कालव्यातील हक्काचे पाणी मिळविण्यासाठी लाभक्षेत्रांतील शेतकऱ्यांना जलसंपदा विभागातील सिंचन शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण तडजोडीबरोबरच त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा अारोप शेतकऱ्यांनी केला आहे. कर्तव्यावर असताना अधिकारी व कर्मचारी बेजबाबदार वर्तन करत असल्याची बाब समोर आली आहे.   
 
नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यात रब्बी हंगाम सिंचनासाठी वैजापूर,गंगापूर,कोपरगाव या तीन तालुक्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. पायथा ते माथा याप्राधान्यक्रमाने लाभक्षेत्रात शेतसिंचनाला पाणीवाटपाचा लाभ दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात गंगापूर तालुक्याला सिंचन नियम पूर्ण केल्यानंतर वैजापूर तालुक्याला सिंचनाचा लाभ देण्याची भूमिका हाती घेतली आहे. नांदूर-मधमेश्वर सिंचन विभागाने कालव्याची तोडफोड व पाणीचोरी रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्याचे दक्षता पथक नेमले आहे. 

दरम्यान, संबंधित अधिकारी, कर्मचारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून मुबलक पाणी देण्याच्या नावाखाली आर्थिक कमाई करून घेत असल्याचा आरोप होत आहे. कालव्यात रब्बी हंगाम पीक सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यातून पिके तगविण्यासाठी पाणी आवर्तनाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना विभागाची अधिकृत पाणीपट्टीव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम कालव्यावर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा खिसा गरम करण्यासाठी द्यावी लागत आहे. शेतकऱ्याकडून आर्थिक देवाणघेवाण स्वीकारण्यासाठी गावागावात अधिकारी, कर्मचाऱ्याने एजंट येथे नेमले आहेत.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा 
हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी पाहुणचाराची सरबराई करून घेण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यावर असताना बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल अभियंत्यासह तिघांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची कारवाई करून त्यांच्याकडून खुलासा न आल्यास कडक भूमिका घेऊ - अशोक शिर्के, कार्यकारी अभियंता, नांमका विभाग. 

सिंचन क्षेत्राचा आकडा जुळेना 
नांदूर-मधमेश्वर कालव्यात रब्बी सिंचनासाठी १.३ टीएमसी पाणी साठ्याचे आवर्तन दिले आहे. वैजापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील एकूण १११ पाणी वापर संस्थांनी नांमकाकडे किती हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी पाणी मागणी नोंदवली आहे, याची आकडेवारी विभागाकडे नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील किती हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल हा विषय अनुत्तरित राहिल्यामुळे वसुलीचे उद्दिष्ट नांमका कार्यालय कसे साध्य करणार हे गौडबंगाल आहे.   
बातम्या आणखी आहेत...