आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी वीज मिळणे अवघड; पोलिसांची आकडे टाकून चोरी, शेट्टींनी उघडकीस आणला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- महावितरणकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागतात. पिके वाचविण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने आकडा टाकून वीज वापरली तर त्याला कारवाईस सामोरे जावे लागते. या समस्यांना कंटाळत अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांचे कुटुंंबीय सर्रासपणे आकडे टाकून विजेचा वापर करीत असल्याचे चित्रीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दाखवून कायदा सर्वांसाठी सारखा का नसावा, असा सवाल केला.
राजूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित विभागीय कापूस, ऊस परिषदेस उपस्थित राहण्यासाठी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे जालना येथे मंगळवारी रात्री आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम होता. बुधवारी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे मॉर्निंग वॉकसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या पोलिस वसाहत परिसरात गेले होते. या भागात काही ठिकाणी आकडे टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आले. या परिसरात ३०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची घरे आहेत. या वेळी राजू शेट्टी यांनी या प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही चित्रफीत दाखवत शेतकऱ्यांनाच कारवाईचा धाक का‌, असा सवाल केला. शेट्टी म्हणाले, एकीकडे शेतकरी वीज मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे पोलिसच आकडे टाकून विजेचा वापर करीत आहेत. महावितरण कंपनी मात्र याकडे डोळेझाक करत आहेत, असेही शेट्टी म्हणाले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सुरेश गवळी आदी.

हायव्होल्टेज लाइन टाकण्यात आली
जालनाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात हाय व्होल्टेज लाइन टाकण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत ही सेवा सुरू झाल्यानंतर कुणालाही वीजचोरी करता येणार नाही. यावर तपासणीची कारवाई सुरू आहे. एफ.आर. पेंढारकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, जालना.

कायदा हा सर्वांसाठी सारखाच
पोलिसकुटुंबांकडून आकडे टाकून वीज वापरण्यात येत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. या प्रकाराची सर्व स्तरांवरून नोंद घेतली जाणार आहे. -राहुलमाकणीकर, प्रभारीपोलिस अधीक्षक, जालना.