आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन जल आयुक्तालय औरंगाबादेत स्थापन करा; आमदार खोतकर यांचे मागणीसाठी आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे जल आयुक्तालय औरंगाबाद येथे स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीतिजल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

औरंगाबाद येथे जल आयुक्तालय झाल्यास मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचे व फायदेशीर ठरणार आहे, अशी भूमिका आमदार खोतकर यांनी घेतली आहे. त्यासाठीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना घेराव घातला. औरंगाबाद येथे जल आयुक्तालय झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत आमदार खोतकर यांच्यासह शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी आमदार खोतकर यांनी जल आयुक्तालय औरंगाबाद येथे स्थापन करण्यामागची भूमिका मांडली. १९९२ पासून जलसंधारणाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. मात्र, या खात्याकडून मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाले. सध्या केंद्रात ग्रामविकास व जलसंधारण खाते एकत्र आहेत. केंद्राच्या वतीने दरवर्षी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि अन्य योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. पुणे येथील कृषी आयुक्तालयामार्फत या योजना राबवल्या जात आहेत; परंतु कृषी अायुक्तालयाकडे अन्य योजना व कृषीविषयक कामे असल्यामुळे त्यांना एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांची पूर्णपणे अंमलबजावणी करता येत नाही. या योजनेसाठी दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी जवळपास एक हजार कोटी रुपये परत जातात. या योजनेखालील निधीचा पूर्णपणे वापर होण्यासाठी औरंगाबाद येथे जल आयुक्तालय स्थापन होण्याची गरज आहे. या योजनेमार्फत सध्याची जलयुक्त शिवार योजना, कोरडवाहू मिशन समाविष्ट करून विकास करण्यासाठीही मदत होईल, असे खोतकर यांनी याप्रसंगी सांगितले. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर,जगन्नाथ काकडे,भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, रावसाहेब राऊत, गणेश सुपारकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जल आयुक्तालय मराठवाड्यासाठी उपयुक्त
पूर्वी कृषी आयुक्तालय पुण्यातून औरंगाबाद येथे आणण्याचा विचार पुढे आला होता. मात्र प. महाराष्ट्रातून विरोध झाला. मराठवाड्यासाठी औरंगाबादेत जल आयुक्तालय झालेच पाहिजे. १५ टक्केही सिंचन क्षमता नसलेल्या मराठवाड्याची टँकरवाडा अशी ओळख निर्माण होत आहे.
अर्जुन खोतकर, आमदार, शिवसेना.
बातम्या आणखी आहेत...