आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - गोदावरी नदीवरील मुद्गल बंधा-यातील पाणी परळी येथील थर्मलच्या वीज केंद्रास देण्यास जिल्ह्यातील जनतेने व शिवसेनेने तीव्र विरोध सुरू केला असून शुक्रवारी सुमारे 300 आंदोलनकांनी आक्रमक पवित्रा घेत बंधा-याच्या गेटजवळील पात्रातच ठाण मांडले. दरम्यान, संतप्त झालेल्या आंदोलकांनी चार शासकीय वाहनांच्या काचा फोडल्या, तरीही आंदोलकांची तमा न बाळगता प्रशासनाने सायंकाळी पाणी सोडले. यामध्ये पात्रात असलेले युवा सेनेचे नेते श्रीनिवास रेंगे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, मुंजा कोल्हे, बाळासाहेब आरबाड यांच्यासह 11 जण या पाण्यात वाहून गेले. दोन किलोमीटर अंतरावर ग्रामस्थांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. यात रेंगे यांच्यासह काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परळी येथील औष्णिक वीज केंद्रासाठी यापूर्वी जिल्ह्यातील खडका (ता. सोनपेठ) येथील बंधा-या तून पाणी घेतले जात असे; परंतु या वर्षी खडका बंधा-या तील पाणीदेखील संपण्याच्या मार्गावर आहे.
येत्या दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यासाठी मुद्गल (ता. पाथरी) येथील गोदावरी नदीवरील बंधा-या तून खडका बंधा-या त व तेथून परळीच्या थर्मलला पाणी सोडण्याचे ठरले. याबाबतची माहिती मिळताच पाथरी तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी गुरुवारीच बंधा-या वर जाऊन गेट उघडण्यासाठी तेथे वीज उपलब्ध नसल्यास बसवण्यात आलेल्या जनरेटरची तोडफोड केली. शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, युवा सेनेचे नेते श्रीनिवास रेंगे पाटील, रवींद्र धर्मे, अर्जुन सामाले, बाळासाहेब आरबाड, माणिक घुंबरे, मुंजा कोल्हे या पदाधिका-यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व विजय सीताफळे हेही बंधा-या वर दाखल झाले.
कार्यकर्ते, पदाधिका-यांसह शेतकरीही बंधा-या वर दाखल झाले. जोरदार घोषणाबाजी करीत कोणत्याही स्थितीत पाणी दिले जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिका-यांनी घेतली. त्यानंतर शेतक-यांनी बंधा-यातील गेटजवळच्या पात्रातच ठाण मांडले. पाणी सोडल्यास त्यातच वाहून जाऊ, परंतु पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती.
दरम्यान, प्रशासनाने दडपशाही करीत पाणी सोडण्याचा प्रकार केल्याचा आरोप कल्याणराव रेंगे यांनी केला आहे.
त्यांनी 11 शिवसैनिक दोन किलोमीटरपर्यंत वाहून गेल्याच्या प्रकरणाचा जाब विचारला जाईल, अशी माहिती दिली.
12 तासांत पाणी पोहोचणार
मुद्गल बंधा-या चे दोन गेट उघडून त्यातून एक मीटर उंचीचे पाणी सोडले असून हे गेट तीन तास उघडे ठेवले जातील. खडका बंधा-या त हे पाणी जायला 12 तास लागतील. तेथून ते परळीच्या थर्मलला सोडले जाईल.
एच.एम.खोरगडे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग
पिण्यासाठीही पाणी आरक्षित
मुद्गल बंधा-या मध्ये सध्या 7.40 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या भागातील सिंचनासाठीही पाणी गरजेनुसार देण्यात येईल.
डॉ.शालिग्राम वानखेडे, जिल्हाधिकारी, परभणी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.