आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभारः शालेय गणवेशाचे बनियनपेक्षाही कमी दर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येकी मुलांचा गणवेश ५७.२१ रुपये, तर मुलींचा गणवेश ६९.७५ रुपयांत खरेदीचे आदेश शासनाने पारित केले आहेत. सध्याच्या काळात ज्या किमतीत बनियन, अंडरवेअरही मिळत नाही त्या किमतीत गणवेश कसे खरेदी करावेत, या पेचात शिक्षण विभागासह शालेय व्यवस्थापन समिती पडली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विविध सुविधा १०३ विकास गटातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २००४-०५ पासून मोफत गणवेश वाटप योजनेची अंमलबजावणी केली जाते. या योजनेचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले. परंतु, गणवेश खरेदीचे दर मात्र शासनाने निश्चित केले. विद्यार्थ्यांची निवड ग्रामसभेत केली जाते. त्यामागे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मापे घेऊन गणवेश शिवला जाईल, विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळेल हा उद्देश आहे. मोफत गणवेश वाटप योजनेत अत्यल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी व अनुसूचित जाती, जमातीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानुसार याही वर्षी मोफत गणवेश वाटपाची योजना आहे.

अत्यल्प दराने खरेदीचे अधिकार
मोफत गणवेश वाटप योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीचे दरही शासनाने ठरवले आहेत. त्यानुसार मुलाच्या गणवेश खरेदीची कमाल मर्यादा ५७ रुपये २१ पैसे, तर मुलीच्या गणवेश खरेदीसाठी कमाल मर्यादा ६९ रुपये ७५ पैसे ठरवली आहे. विशेष म्हणजे यात कापड आणि शिलाईचा खर्चही अंतर्भूत आहे. सध्याच्या काळात अंडरवेअर व बनियनची किंमतही यापेक्षा जास्त आहे.

४८ लाखांची तरतूद
जिल्ह्यात १०३ विकास गटातील मोफत गणवेश वाटप योजनेत ४१ हजार ९५० मुले व ३४ हजार ४०९ मुली लाभार्थी आहेत. त्यांच्या गणवेशासाठी ४७ लाख ९९ हजार ९८९ रुपयांची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या ७६ हजार ३५९ विद्यार्थ्यांसाठी शासनाने गणवेशासाठी अवघी ४८ लाखांची तरतूद केली आहे.

शासनाने फेरविचार करून निर्णय घ्यावा
शासनाने किमान आजच्या महागाईचा विचार करावा. शालेय गणवेशाची किंमत वाढवणे गरजेेचे आहे, तरच विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा, टिकाऊ गणवेश देता येईल. ही योजना १०-११ वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे शासनाने ठरवलेले गणवेशाचे दरही तेव्हाचेच असावेत. फेरविचार करून शासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा ही योजना थातूरमातूर स्वरूपातच राबवली जाईल. -विजय अक्कलवाड, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, टेंभी, ता. हिमायतनगर.
बातम्या आणखी आहेत...