बीड- वेरूळजवळ सापडलेला शस्त्रसाठा व २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल सध्या मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात अंडा सेलमध्ये उपोषण करत आहे. दरम्यान, ‘माझा मुलगा निर्दोष असून उपोषणादरम्यान त्याच्या जीवाला धोका झाला तर त्यास सरकार जबाबदार राहील’, असा इशारा जबीची आई रेहाना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
कारागृह प्रशासन देत असलेल्या वागणुकीच्या विरोधात जबीने पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. यावर जबीची आई रेहाना, वडील जकीरोद्दीन सय्यद , बहीण राफिया परवीन यांनी पत्रपरिषद घेतली. रेहाना म्हणाल्या, ‘एटीएस आजपर्यंत जबीविरुद्ध ठोस पुरावे देऊ शकले नाही. तो निर्दोष आहे. त्याला पोलिसांनी गोवले आहे. त्याला अंडा सेलमध्ये ठेवणे नियमबाह्य आहे. त्याला बाहेर काढावे. गेल्या नाेव्हेंबरमध्ये कारागृहात जबीची भेट घेतली होती. काही मिनिटांची ही भेट होती, असे रेहाना म्हणाल्या.