आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबी, कागजीशी राजरोस भेटीगाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशद्रोही कारवाया करून फरार झालेले जबिउद्दीन अन्सारी व फय्याज कागजी यांना शोधण्यासाठी गुप्तचर यंत्रणा जंगजंग पछाडत असताना, हजला गेलेले बीडचे काही नागरिक मात्र सौदीत त्यांच्या राजरोस गाठीभेटी घेत होते, हे वास्तव समोर आले आहे. पोलिस आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या याच माहितीच्या आधारे जबीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. फय्याजचा अद्याप शोध लागलेला नाही.
9 मे 2006 रोजीच्या वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणानंतर महाराष्ट्र एटीएस आणि देशाच्या प्रमुख गुप्तचर संस्थांनी फरार जबिउद्दीन अन्सारी आणि फय्याज कागजी यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. ते पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती आल्यानंतर काही काळ उलटला. दरम्यानच्या काळातच म्हणजे 2008च्या सुमारास जबी सौदीत असल्याची कुणकुण गुप्तचरांना लागली होती. त्याला सौदीत शोधून पाळत ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासोबतच बीडमध्येही यंत्रणा कार्यरत झाली. स्थानिक पोलिस, एटीएस, आयबी यांनी खब-यांचे जाळे तयार केले. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यानंतर एनआयएची त्यात भर पडली. या सर्व यंत्रणांनी आपापल्या परीने माहिती खणायला प्रारंभ केला.
नैराश्यामुळे नव्हे, नियोजनबद्ध कट- जबी, फय्याज यांच्यासारखे तरुण दहशतवादी कारवायांमध्ये ओढल्या जाण्यामागे बेकारी, गरिबी, नैराश्य असल्याचे काही जण सांगतात. पोलिस, गुप्तचर यंत्रणा व मुस्लिम समाजातील विचारवंतांनाही ते पटणारे नाही. जबी निष्णात इलेक्ट्रिशियन होता, त्याला रोजगाराची चिंता नव्हती. फय्याज बी.एड.पर्यंत शिकलेला होता. त्याचे वडील, भाऊ चांगल्या नोकरीत आहेत. त्यांच्या साथीदारांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे देशद्रोह्यांच्या संपर्कात आल्यामुळेच हे तरुण विघातक कृत्यामध्ये ओढले गेले. त्यांनी नियोजनबद्ध रीतीनेच कारवाया केल्या, असा निष्कर्ष आज काढला जात आहे.