आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रुळात जॅक अडकला; दहा मिनिटांत १३ कर्मचारी घामाघूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी/ सेलू - रेल्वे स्टेशनवरील पटरीच्या किरकोळ दुरुस्तीचे काम बुधवारी दुपारी सुरू असताना कामगारांनी पटरीला लावलेला जॅक अडकल्याने मोठी तारांबळ उडाली. हा जॅक १० मिनिटांच्या महत परिश्रमानंतर सबलीने तोडून काढला. यासाठी १३ कर्मचारी घामाघूम झाले होते. दरम्यान, त्याच वेळी काचीगुडा-मनमाड ही रेल्वे स्थानकात प्रवेश करीत होती. मात्र वेळीच दुरूस्ती केल्याने रेल्वे गाड्यांवर काहीही परिणाम झाला नाही.

स्थानकावर पटरीच्या किरकोळ दुरुस्तीचे काम दुपारी सुरू असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या गाड्यांना दोन व तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर घेण्यात आले होते. प्लॅटफार्म तीनवर परळी-अकोला, दोनवर नगरसोल-नरसापूर असल्याने प्लॅटफॉर्म क्र. एकवर काचीगुडा-मनमाड पॅसेंजर घेण्यात आली. प्लॅटफॉर्म एकवर काम चालू असताना तीन वाजून १० मिनिटांनी काचीगुडा-मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये येत असताना कामगारांनी पटरीला लावलेला जॅक अडकल्याने व सहसा निघत नसल्याने जॅक काढण्यासाठी कामगारांची तारांबळ उडाली. एरवी सहजासहजी निघणारा जॅक अधिकच घट्ट बसला होता. सुमारे १० मिनिटांच्या परिश्रमांनंतर कर्मचाऱ्यांना अडकलेला जॅक काढण्यात यश मिळाले आणि रेल्वे कामगारांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी स्टेशनमध्ये घेण्यात आली. असा प्रकार सहसा घडत नाही, असे कामगारांनी या वेळी सांगितले.

ब्लॉकच्या तपासणीसाठी नियमित चाचणी
रेल्वे विभागाचा परभणी स्टेशनवर स्वतंत्र अभियांत्रिकी विभाग असून याअंतर्गत परभणी ते पूर्णा रेल्वेमार्गावरील पटरीची नियमित तपासणी केली जाते. रेल्वे पटरीची जोड असलेल्या ठिकाणी पाहणी केली जाते. मेंटेनन्सचे काम नियमितपणे केले जाते. ज्या ठिकाणी लेव्हल कमी-जास्त होते, त्या ठिकाणी ते नट-बोल्ड कसून बरोबर केले जाते. यासाठी प्रशिक्षित कामगारच हे काम करत असतात.

रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही
इंजिनिअरिंग विभागाकडून नियमितपणे पटरीची तपासणी केली जाते. यात लेव्हल पाहून जॅक लावून काम केले जाते. बुधवारीही अशीच तपासणी तंत्रज्ञांनी केली. त्यात जॅक फसल्याची माहिती नाही. मात्र, यामुळे कोणत्याही रेल्वेच्या वाहतुकीवर वा तिच्या थांब्यावर परिणाम झालेला नाही.
देविदास भिसे, स्टेशन व्यवस्थापक, परभणी

पाणी साचल्याने जॅक फसला
नियमित दुरुस्तीत स्टेशनवरील पटरीची तपासणी सुरू होती. त्यात रेल्वे थांबत असल्याने एके ठिकाणी पाणी साचल्याने चिखल झाला होता. जॅक लावल्यानंतर खालच्या बाजूला चिखल असल्याने लेव्हल केल्यानंतर तो फसला. परंतु अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तो काढण्यात आला. याचा रेल्वे वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. मुळातच दुरुस्तीची माहिती रेल्वे प्रशासनास असल्याने दुपारी स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या रेल्वेची स्पीड कमी ठेवण्यात आली होती.
संजीव चव्हाण, रेल्वे अभियंता