आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी पद्धतीने जायकवाडीला पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अनुकूल असल्याची माहिती मराठवाडा विकास आणि संशोधन प्रतिष्ठानचे संचालक व जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी सोमवारी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जायकवाडी धरणात वरच्या भागातील धरणांतून समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी 23 रोजी झाली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने 5 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार या.रा. जाधव यांना प्राधिकरणासमोर बाजू मांडण्यास बोलावण्यात आले. या सुनावणीसाठी आमदार प्रशांत बंब उपस्थित होते.
मराठवाड्याची बाजू मांडली
या सुनावणीत या.रा. जाधव यांनी जायकवाडीच्या पाण्याबाबत मराठवाड्याची बाजू जोरकसपणे प्राधिकरणासमोर मांडली. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2005 कलम 12 (6) ग, या कायद्यातील तरतुदी, महाराष्ट्र राज्य जलनीती, गोदावरी-कृष्णा पाणीवाटप लवाद मंडळाचे निर्देश, त्यांनी सुचवलेली पाणीवाटपाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे याचे दाखले देत त्या कायद्याची अंमलबजावणी करणे कसे आवश्यक आहे व प्राधिकरणावर बंधनकारक आहे हे प्राधिकरणासमोर मांडले. मराठवाड्यातील दरडोई, दरहेक्टरी पाणी उपलब्धता, दरडोई उत्पन्न याची सविस्तर आकडेवारी प्राधिकरणासमोर मांडून, महाराष्ट्राच्या समतोल विकासासाठी व प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी प्रचलित कायद्याची अंमलबजावणी करून जायकवाडी प्रकल्पाला त्याच्या हक्काचे पाणी दरवर्षी देण्याची आवश्यकता जाधव यांनी प्राधिकरणासमोर मांडली.

कोर्टात अहवाल देणार
उच्च् न्यायालयाने 5 मे रोजी या.रा. जाधव यांची बाजू ऐकून समन्यायी पाणीवाटपाबाबत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची काय भूमिका आहे हे न्यायालयात सादर करण्यास सांगितले. प्राधिकरणाने 23 रोजी या.रा.जाधव यांची सुनावणी घेऊन बाजू ऐकली. प्राधिकरण आता 31 जुलैपूर्वी समन्यायी पाणीवाटपाबाबत आपली भूमिका न्यायालयासमोर मांडणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

प्राधिकरण अनुकूल
प्राधिकरणाचे अध्यक्ष रवी बुद्धिराजा यांनी या सुनावणीच्या वेळी कायदा कलम 12 (6) ग ची अंमलबजावणी करण्यास प्राधिकरण अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. फक्त ती अंमलबजावणी कशी करावी याबाबतच्या पद्धतीचा विचार करीत असल्याचे बुद्धिराजा म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. येत्या हंगामापासूनच जायकवाडी धरणात समन्यायी पाणीवाटप मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे जाधव म्हणाले.