आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना शहरासह लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यात सर्वाधिक 136 मि.मी. पावसाची नोंद
जालना - शहर व जिल्ह्यात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 86 मि.मी. पावसाची नोंद झाली असून जालना तालुक्यात सर्वाधिक 136 मि.मी. पाऊस झाला आहे, तर जाफराबाद तालुक्यात सर्वात कमी 64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सहा मध्यम प्रकल्प आहेत, उन्हाळाअखेर या सर्व प्रकल्पांनी तळ गाठला होता. मात्र, आता या प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे 5 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 2 लाख 70 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
जळकोट तालुक्यात 303 मि.मी.
लातूर- यंदाच्या मोसमात लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात सर्वाधिक 303 मि.मी. पाऊस पडला आहे. रविवारी रात्री काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. लातूर, औसा, रेणापूर तालुक्यात तुरळक बरसत पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्याला हुलकावणी दिली. मात्र जळकोट, उदगीर, अहमदपूरच्या भागात जोरदार तर चाकूर आणि निलंगा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्याने पावसाची 178.53 इतकी सरासरी गाठली आहे. पावसाचा लहरीपणा कायम आहे. डोंगरी आणि अवर्षणग्रस्त असलेल्या जळकोट तालुक्यात जोरदार तर अन्य तालुक्यांत फारच कमी पाऊस झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात 14.31 मि.मी
नांदेड - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 14.31 मि.मी.पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक 50 मि.मी.पावसाची नोंद माहूर येथे झाली. त्यापाठोपाठ 29 मि.मी.पावसाची नोंद देगलूर येथे झाली. जिल्ह्याच्या इतरही तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात पिकांना पोषक पाऊस होत असला तरी अद्यापही नदी,नाले तुडुंब भरून वाहिले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या कायम आहे. अद्यापही जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी 127 टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात 9 जुलैपर्यंत सरासरी 161 मि.मी. पाऊस झाला आहे. 9 जुलैपर्यंत 2010 मध्ये जिल्ह्यात 272 मि.मी. तर 9 जुलै 2011 मध्ये 162 मि.मी.पाऊस झाला होता.
परभणीत मध्यम स्वरूपाचा
परभणी - परभणीसह पूर्णा, गंगाखेड व जिंतूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी दहा ते पंधरा मिनिटे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती.
बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस
बीड - सोमवारी दुपारच्या सुमारास शहर परिसरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्यात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. रविवारी पाटोदा, आष्टी, माजलगाव, केज, धारूर, परळी तालुक्यांत पाऊस झाला नाही. बीड, गेवराई, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यात नोंद झाली.