परतूर (जालना) - अज्ञात समाजकंटकाने परतूर येथे शनिवारी रात्री धुगडुस घालत एका शाळेचे कार्यालय तसेच मुख्य रस्त्यावर उभ्या असलेले दोन ट्रक पेटवून दिले. यात मोठे नुकसान झाले असुन जीवितहानी झालेली नाही मात्र या प्रकारामागचे नेमके कारण समोर आले नसल्याने लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाची सोखल चौकशी सुरु केली असून शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित दिसत आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील दत्तनगर येथील आनंद विद्यालयाचे कार्यालय पेटवून देण्यात आले. त्यानंतर मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन ट्रक पेटवल्या. परतूर शहरातील किराणा दुकानदार तसेच जनरल स्टोअर्स व्यापाऱ्यांनी जालना शहरातून मागवलेला माल या ट्रकमधून परतूर येथे आणण्यात आला होता. नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
रविवारची सुटी असतानाही आनंद विद्यालयाच्या प्रशासनाने शाळेचे कार्यालय उघडून जळालेल्या कागदपत्रांची तसेच साहित्याची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. काहीच कारण नसताना एकाच रात्रीत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपी एकच आहे किंवा वेगवेगळे आहे याचा उलगडा होऊ शकला नाही. याप्ररकणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.