आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यामुळे जालना-अंबड वाद; पाण्‍यावरुन आमदार टोपे-गोरंट्यालमध्‍ये संघर्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जायकवाडी योजनेचे पाणी जालन्यात येण्यापूर्वी जालनेकर पाण्यासाठी त्रासले होते. शहरात २५ ते ३० दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. तेव्हा शहागड योजनेतून अंबड शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू होता त्यावेळेला सामाजिक जाणीव आणि माणुसकी कुठे होती? असा सवाल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमदार राजेश टोपे यांना केला. जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोरंट्याल बोलत होते.

सामािजक जाणीव ठेवून जायकवाडी योजनेतून अंबड शहराला पाणी मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आमदार राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केली होती. जायकवाडी योजना राज्य शासनाचीच असून अंबडला पाणी देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीतच झाला असल्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी सांगितले होते. आमदार टोपे यांच्या या वक्तव्याचा गोरंट्याल यांनी समाचार घेतला. जायकवाडी योजना जालना नगरपालिकेची आहे. अंबड पालिकेचा या योजनेशी काहीच संबंध नाही.
आपण पाठपुरावा करून या योजनेसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून आणला, तसेच विद्युत जोडणीसाठी जालनेकरांना घेऊन जनआंदोलन केले. त्यामुळे इतरांनी या योजनेवर हक्क सांगू नये, असे गोरंट्याल याप्रसंगी म्हणाले.नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांतसिंग यांच्या उपस्थित बैठक झाली होती. त्यानुसार वॉटर युटीलिटी कंपनी स्थापन करण्याच्या सूचना होत्या. यात अंबड पालिकेने १५ कोटी रुपयांचा शेअर भरावा अशा सूचना होत्या, मात्र अंबड पालिकेने अद्याप पैसे भरले नाहीत. हे पैसे भरल्यानंतरच पाणी देण्यासंदर्भात विचार करू असे गोरंट्याल यांनी सांगितले.

जालना शहरवासीयांनो धोका ओळखा
अंबड पालिका आता पाणी मागते आहे, परंतु त्यांना आता पाणी दिले तर भविष्यात जालना शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. पुन्हा येथील महिलांना टँकरमागे धावावे लागेल. हा धोका नको म्हणून आपण या योजनेतून अंबड पालिकेला पाणी देण्यास विरोध करीत आहोत, असे गोरंट्याल यांनी सांगितले.