आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर जालन्याला रोज दोन वेळा पाणी, शिरपूर बंधाऱ्यांच्या कामाला आज प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे सहा बंधारे तयार करण्याच्या कामाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. यापूर्वीच लोकसहभागातून दोन बंधारे पूर्ण झाले असून आणखी दोन बंधारे प्रस्तावित आहेत. वर्षभरात अशा प्रकारे १० बंधारे बांधले जाणार आहेत.
प्रत्येकी अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या बंधाऱ्यांमुळे कुंडलिका नदीपात्रात जवळपास २५ कोटी लिटर पाणी साठवले जाणार आहे. त्यापेक्षा जास्त पाणी भूगर्भात साठणार आहे. यामुळे घाणेवाडी तलाव ते जालना शहर या नऊ किलोमीटरवरील कुंडलिकेच्या दुतर्फा असलेली हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. शिवाय जालना शहराला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करणेही शक्य होईल, असा विश्वास जलतज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केला.
२०१२-१३ या वर्षात िजल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने रेल्वेने पाणी आणण्याची वेळ जालनेकरांवर आली. अशा परिस्थितीत जालना शहर टँकरमुक्त करण्यासाठी शिरपूर पॅटर्नचे बंधारे हाच उपाय असल्याचे जलतज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर यांनी सांगितले होते. त्यासाठी घाणेवाडी तलाव ते जालना शहरातील रामतीर्थ पुलापर्यंत १० बंधारे बांधण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता.
त्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टने मुख्यमंत्री साहायता निधीला आठ कोटींची मदत दिली होती. मुख्यमंत्री निधीतून हे सर्व पैसे तातडीने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले. मात्र, प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात दोन वर्षे गेल्याने या निधीचा वापर करता आला नाही. आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आठपैकी सहा बंधाऱ्यांच्या कामाला रविवारपासून प्रारंभ
होत आहे.
सकाळी १० वाजता कुंडलिका नदीवर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार अाहे. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, अामदार अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, राजेश टोपे, नारायण कुचे, जिल्हाधिकारी एएसआर नायक, जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
अशी असेल शिरपूर साखळी बंधाऱ्यांची रचना
कुंडलिका नदीपात्राच्या रुंदीइतका म्हणजेच ५० मीटर रुंद सिमंेंट बांधारा बांधला जाणार आहे. बंधाऱ्याच्या भिंतीसाठी तीन मीटर खोल खोदकाम केले जाणार आहे, तर नदीपात्रापासून सिमेंट बंधारा तीन मीटर उंच असणार आहे. बंधाऱ्यापासून ५०० मीटरपर्यंत नदीपात्रात खोदकाम केले जाणार आहे. साधारणपणे खडक लागेपर्यंत खोदकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नदीच्या पात्राच्या साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. शिवाय भूगर्भात पाणी साठण्यास मदत होणार आहे.
शिरपूरमध्ये क्रांती; जालन्यातही हे शक्य
कुंडलिका नदीवरील १० बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर जालना शहराला दिवसभरातून दोन वेळा पाणीपुरवठा करता येईल असा विश्वास शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ डॉ.सुरेश खानापूरकर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, बंधारे पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यापासून जवळच वेगवेगळ्या ठिकाणी चार विहिरी खोदण्यात याव्यात. बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झालेली असेल शिवाय बंधाऱ्यातील पाणी पाझरून विहिरीत येईल. पाझरलेले पाणी नैसर्गिक पध्दतीने फिल्टर झालेले असेल. त्यामुळे शुध्दीकरणाच्या खर्चात बचत होईल. चारपैकी दररोज दोन विहिरीतून शहराला पाणी द्यावे. विशेष म्हणजे गुरुत्व पध्दतीने हे पाणी देता येईल. त्यामुळे वीज बिलासाठी खर्चही होणार नाही. अशा प्रकारे दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा करून संपूर्ण शहराची पाण्याची गरज भागवणे शक्य होईल. शिरपूरमध्ये क्रांती झाली जालन्यातही हे शक्य होईल असे डॉ.खानापुरकर म्हणाले.
कुंडलिका नदी जिवंत होणार
घाणेवाडी जलाशय ते जालना शहरातील रामतिर्थ पुलापर्यंतचे अंतर नऊ िकलोमिटर आहे. या अंतरात सध्या दोन बंधारे आहेत तर आणखी आठ बंधारे होणार आहेत. त्यामुळे जवळपास ८०० मिटरवर एक बंधारा होणार असल्याने कुंडलिका नदी जिवंत होणार आहे. सध्या हिवाळा सुरू होताच नदी पात्र कोरडे पडते. मात्र बंधारे पूर्ण झाल्यास संपूर्ण नदीपात्र जलमय होईल. त्यामुळे नदीच्या परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल. शिवाय घरगुती बोअर रिचार्ज होणार आहे.
सध्याची परिस्थिती
आमदार अर्जुन खाेतकर, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आणि घाणेवाडी जलसंरक्षण मंच यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून रामतीर्थ पूल आणि निधोना अशा दोन ठिकाणी शिरपूर बंधारे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बंधाऱ्यांत मागील वर्षी उन्हाळ्यातही पाणी होते. तसेच या वर्षी अजूनही या दोन्ही बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आहे. रामतीर्थ पूल व निधोना या बंधाऱ्यांच्या परिसरात भूगर्भातील पाणीपातळी ६५ मीटरवरून १५ मीटरवर आली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला आहे. दोन वर्षांपासून येथील शेतकरी दोन पिके काढत आहेत.
सहा दिवसांनी पाणीपुरवठा
जालना शहराला सध्या घाणेवाडी आणि जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी जालना शहराचे ४५ झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार चार ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यात दरडोई साधारणपणे १३५ लिटर पाणी दिले जाते. तांत्रिक अडचणींमुळे यात काही प्रमाणात बदल होतो. त्याशिवाय शहरातील काही भागात कूपनलिकांचे पाणीही वापरले जाते. तर दुसरीकडे जायकवाडी जलयोजनेच्या पाण्यासाठी जालना नगरपालिकेला महावितरणकडे महिन्याला २५ ते ३० लाख रुपये विज बिल भरावे लागते.