जालना - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात "नासा' च्या वतीने नागरिकांना
आपले नाव मंगळवार पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपलेही नाव मंगळावर जाण्यासाठी नासाच्या संकेतस्थळावर नावे नोंदविली असल्याने जालनेकरांचीही नावे मंगळावर जाणार आहेत.
मंगळ मोहीम यशस्वी झाल्याने नासाची माहिती जाणून घेण्यासाठी कल वाढला आहे. गत महिन्यात नासाच्या वतीने "मार्स ऑर्बिनेटर मिशन' या संकेतस्थळ अंतर्गत प्रतिक्रिया तसेच व्हिडिओ, ग्राफिक्स अपलोड करण्याचेही अवाहन केले होते. यातही जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. चंद्र, मंगळावर जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे. मात्र, हे सर्वांना जाणे शक्य नाही. परंतु त्यांचे नाव नासाकडून यानाद्वारे मंगळावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती नासाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यासाठी नासा संकेतस्थळावर ऑनलाइन "ओरियन मार्स व्हिजिट' हा फॉर्म भरावा लागतो. यात आपले नाव, राज्य, पोस्टल कोड, ई-मेलआयडी अशी माहिती भरून घेतली जाते. सदरील माहिती अपलोड करून प्रत्येकाच्या नावाची एक चिप तयारी केली जाणार असून ती चिप यानाद्वारे मंगळावर पाठविली जाणार आहे. ऑनलाइन फॉर्म ३१ ऑक्टोबरपर्यंत भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालय जनजागृती
नासासंदर्भात अनेकांना माहिती नाही. मंगळ संदर्भात जाणून घेण्यासाठी अनेकांची इच्छा आहे. मात्र, त्याची जनजागृती अत्यल्प असल्यामुळे त्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी जणांचा आहे. शाळा, महािवद्यालयात जनजागृती होण्याची गरज आहे.
असा भरा फॉर्म
नेममध्ये नाव आडनाव टाकून कन्ट्री ऑप्शनमध्ये देशाचे नाव टाका. नंतर पोस्टल कोड टाकून ई-मेल आयडीमध्ये इमेल नोंद करून प्रायव्हसी पॉलिसीमध्ये कोड नंबर टाकून सेंड माय नेम म्हटल्यानंतर नासाच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या नावाचा बोर्डींग पास तयार होईल. त्याची आपण प्रिंटही काढू शकतो.
सहभाग वाढावा
भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळयान मोहीम यशस्वी करून मोठे यश मिळवले आहे. याची जनजागृती वाढवण्यासाठी नासाने हाती घेतलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन जिल्ह्याचीही मान उंचावली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना नासाचे संकेतस्थळ उघडून मंगळ यानाविषयी माहिती द्यावी.
डॉ. प्रवीण कोकणे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख बारवाले महाविद्यालय, जालना.