आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात सफाई कामगारांचे काम बंद; नगरपालिकेवर मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना नगर पालिकेचे कर्मचारी बुधवारी काम बंद आंदोलनादरम्यान काळी फिती लावून पालिका कार्यालयाच्या बाहेर बसले होते. - Divya Marathi
जालना नगर पालिकेचे कर्मचारी बुधवारी काम बंद आंदोलनादरम्यान काळी फिती लावून पालिका कार्यालयाच्या बाहेर बसले होते.
जालना - नगरपालिकेच्या सफाई कामगाराच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सफाई कामगारांनी बुधवारी एकदिवसीय संप केला. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसह मृताच्या वारसास नोकरीत सामावून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. वसंत पंडित साठे (५०, जुनी नगरपालिका क्वार्टर, जालना) असे मृताचे नाव आहे.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी वसंत साठे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर साठे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सफाई कामगारांनी लावून धरली. या वेळी २०० हून अधिक सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, सफाई कामगारांनी केलेल्या या संपामुळे बुधवारी शहरात ठिकठिकाणी घाण साचली होती.

नोकरीत घेण्याचे आश्वासन
बुधवारी दुपारी मृत वसंत साठे यांच्या कुटुंबीयांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात जाऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी मृताच्या वारसास नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्वच्छता निरीक्षक डी. टी. पाटील उपस्थित होते.
आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात
सफाई कामगार साठे यांनी मंगळवारी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम केल्यानंतर पुन्हा वरिष्ठांनी त्यांना रात्री कामावर नेले होते. उशिरापर्यंत काम केल्यावर त्यांना उलट्या होऊ लागल्या. या वेळी वरिष्ठांनी साठे यांना रुग्णालयात न नेता तेथेच आराम करण्याचे सांगितले. तसेच उशिरा रात्री रिक्षामध्ये बसवून नगरपालिका क्वार्टर येथील घरी नेऊन सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता कुटुंबीयांना साठे मृतावस्थेत आढळले. या प्रकरणानंतर मृत साठे यांच्या नातेवाइकांनी आक्रोश करत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शिवाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला. मात्र, पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी करण्यात आला.
कुटुंबावर शोककळा
सफाई कामगार वसंत साठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली आहेत. यातील दोन मुली व एका मुलाचे लग्न झालेले आहे. वसंत साठे हेच कुटुंबाचा मोठा आधार होते. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चौकशी होणार
साठे यांनी दिवसा नियमित ड्यूटी करूनसुद्धा त्यांना रात्री कामावर का बोलावले गेले, कुणाच्या सांगण्यावरून नेले, नेमके कोणते काम करून घेण्यात आले, मृत्यूचे कारण कोणते, यात कोण दोषी आहेत, याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. यास मुख्याधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.
बातम्या आणखी आहेत...