आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - या वर्षी राज्यातील सर्वात कमी पाऊस जालना जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम शेतक-यांच्या हातून गेले आहेत. त्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर आणि पर्यायाने साखर उता-या वर झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना 60 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवर्षी मार्च, एप्रिलपर्यंत चालणारे गाळप या वर्षी पाणीटंचाईमुळे फेबु्रवारीपर्यंतच चालणार आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार ऊसतोड मजूर व इतर कामगारांवर अन्यत्र कामासाठी भटकंतीची वेळ येणार आहे.
जिल्ह्यात तीन सहकारी आणि एक खासगी या चार कारखान्यांनी विविध ठिकाणांहून ऊस आणत गाळप सुरू केले आहे. भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत 1 लाख 79 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून 1 लाख 72 हजार 900 पोती साखर उत्पादन केले आहे. गतवर्षी सरासरी 10.60 टक्के असलेला उतारा या वर्षी 9.76 वर आला आहे. अंबड तालुक्यातील समर्थ सहकारी साखर कारखाना उत्पादनात आघाडीवर आहे. कारखान्याने आतापर्यंत 3 लाख 12 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 3 लाख 7 हजार 650 क्विंटल साखर उत्पादन केली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी साखर उतारा 1 टक्क्याने घटला आहे. गतवर्षी ‘समर्थ’ने 11 टक्के उतारा मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र, या वर्षी केवळ 10.5 टक्के उतारा मिळाला आहे. सागर सहकारी साखर कारखान्यानेही 1 लाख 71 हजार 810 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, त्यांनाही साखर उतारा सरासरीपेक्षा कमीच मिळाला आहे. घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर या खासगी कारखान्याने यावर्षी 1 लाख 25 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यांना सरासरी 10.50 इतका साखर उतारा मिळाला आहे.
‘रामेश्वर’मध्ये पाण्याचा पुनर्वापर
जिल्ह्यात शेतक-यांना सरासरी एकरी 30 ते 45 टन ऊस उत्पादन होते. मात्र, तेच प्रमाण या वर्षी केवळ 15 ते 20 टनांवर आले आहे. समर्थ कारखाना टँकरद्वारे पाणी आणत आहे, तर रामेश्वर कारखान्यात रस उकळताना गरम झालेले पाणी थंड करून पुन्हा वापरले जात आहे.
पुढील हंगामावर प्रश्नचिन्ह
दुष्काळामुळे साखर कारखानदारीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. या वर्षी जिल्ह्यात नव्याने ऊस लागवड झालीच नाही. त्यामुळे पुढील वर्षी गाळपासाठी पाचशे हेक्टर तरी ऊस मिळेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामावरही परिणाम होणार आहे.
अंकुशराव टोपे, चेअरमन, समर्थ सहकारी साखर कारखाना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.