आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalna In Boys Kidnapping, Maker Changed 12 Places

३६ तासांच्या नाट्यानंतर मुलाची सुटका, अपहरणकर्त्याने बदलली १२ ठिकाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - दोन रात्री अन् एक दिवस अशी ३६ तासांत १२ ठिकाणे बदलून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या अपहरणकर्त्याच्या तावडीतून १७ वर्षीय मुलास सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. चित्रपट कथानकाला शोभेल अशा या थराराचा समोराप घनसावंगी-अंबड रोडवरील बहिरगड शिवारातील रामगव्हाण तलावाजवळ मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता झाला.
या वेळी आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी थेट अपहरणकर्त्याच्या गाडीवर झडप घालून शिताफीने मुलास सुखरूप ताब्यात घेतले. एहतेशाम मंजूर अहमद (१७) असे सुटका झालेल्या मुलाचे नाव असून गोळीबारात त्याचा भाऊ इफ्तेखार जखमी झाला आहे.
२७ रोजी ५.३० वाजता जालना शहरातील आनंदनगर भागातून एहतेशाम याचे १५ लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी मुलाचा भाऊ इफ्तेखार याने तालुका जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याआधारे मध्यरात्री १ वाजता आरोपी गजानन तौर (शिवणगाव, ता. घनसावंगी) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर व सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलिसांची ५ पथके तैनात करण्यात आली. आरोपीकडून इफ्तेखार याच्याकडे होणारी १५ लाख रुपयांची मागणी व गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती याआधारे आरोपी गजानन हा हिंगोली व वसमतच्या दिशेने गेल्याचे समजले. यानुसार पोलिसांचे एक पथक हिंगोली, तर दुसरे पथक वसमत शिवारात पहाटे ३ वाजता पोहोचले. तब्बल तीन तास या ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, इफ्तोखार हा एवढ्या रात्री एकटा नसेल त्याच्यासोबत आणखी कुणी असतील, अशी शंका आल्यामुळे आरोपी हिंगोलीवरून सकाळी ६ वाजता पसार झाला.

पुन्हा १० वाजता आरोपी कळमनुरी शिवारात असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांचे एक पथक कळमनुरीत, तर दुसरे पथक नांदेडच्या दिशेने गेले. याठिकाणीसुद्धा तीन तास फिरवल्यावर १ वाजता आरोपी हिंगोलीजवळ आले. या ठिकाणाहून परत जिंतूरच्या दिशेने गाडी नेत त्यांनी ५ वाजता औंढा नागनाथ गाठले. या वेळी पोलिसांनी औंढा व वसमत दोन ठिकाणी यंत्रणा कामाला लावली. औंढा नागनाथ येथून आरोपी ८ वाजता जिंतूरमध्ये आले. येथे आल्यावर आरोपींनी पुन्हा एक शक्कल लढवत हिंगोलीकडे बोलावले. रात्रीचे ११.३० वाजले. आरोपी आपणास हुलकावणी देत असल्यामुळे जालना पोलिसांनी मोबाइल टॉवर लोकेशनवरून मिनिट-टू-मिनिट शोध सुरू केला. हिंगोलीतील रेल्वेस्थानक, बसस्थानक, लॉज, ढाबे आदींची झडती घेतली; मात्र पदरी अपयशच पडले. मध्यरात्री आरोपी जालन्याच्या दिशेने निघाले. १२.३० वाजता परतूर, तर १.३० वाजता जालना व २ वाजता अंबड तालुक्यात आरोपी आल्याची माहिती मिळाली. याआधारे स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिस ठाणे, विशेष कृती दलाच्या अन्य पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनासुद्धा अलर्ट करण्यात आले.

काही पोलिस चारचाकी टाटा सुमो, कार, तर काही जण दुचाकीवर होते. ४ वाजता अारोपी गजाननने इफ्तोखार यास बहिरगड शिवरातील रामगव्हाण तलावाजवळ बोलावले. येथेसुद्धा ४५ मिनिटे आरोपींनी चकवा दिला. शेवटी पहाटे ४.४५ वाजता आरोपी गजानन व अपहरण झालेल्या एहतेशामचा भाऊ इफ्तेखार व पोलिस समोरासमोर आले. सुरुवातीला फक्त इफ्तेखार हाच समोर दिसला; पोलिसांची चाहूल लागताच एकाने गोळीबार केला. यात तो जखमी झाला. इकडे पोलिसांनी झडप मारून एहतेशाम यास सुखरूप ताब्यात घेतले. हे पाहून आरोपींनी पळ काढला.
पुढील स्‍लाइडवर वाचा खंडणीसाठी दोन रात्री अन् एक दिवस फिरवले मुलाला...