छायाचित्र- नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे व मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांचे अभिनंदन करताना विभागीय आयुक्त संजय जयस्वाल.
जालना - संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात जालना नगरपालिकेला मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. पालिकेच्या या यशानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते नगराध्यक्षा आणि मुख्याधिका-यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
२०१३-१४ या वर्षासाठी हा पुरस्कार होता विभागातील अ वर्ग नगरपालिकांमधून जालना पालिकेने हा पुरस्कार मिळवला आहे.
पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. त्याशिवाय नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी स्वत: स्वच्छतेच्या कामांना भल्या पहाटे भेटी देऊन तपासणी केली. त्यात गैरहजर असणा-या कमर्चा-यांवर कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छता विभागाला काही प्रमाणात शिस्त लागली आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी ए. रंगानायक यांनीही सूचना देऊन शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यास सांगितले होते. यात एकाच दिवशी एकाच प्रभागात सर्व कर्मचा-यांनी स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिकेने स्वच्छता केली त्यातही मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्यात यश आले. पुरस्कारासाठी स्वच्छतेशिवाय इतर काही निकषांवर पालिकेच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली.
ही साधने हवीत
तेराव्या वित्त आयोगातून पालिकेच्या स्वच्छता विभागासाठी आणखी साधने आणि साहित्य विकत घेतले जाणार आहे. यात ट्रॅक्टर, लोडर, घंटागाडी, जे.सी.बी. आदींचा समावेश आहे. या साहित्यासाठी जवळपास २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे साहित्य मिळाल्यानंतर स्वच्छता विभाग सर्व साधनांनी परिपूर्ण होणार आहे.
हे होते इतर निकष
यात स्वच्छतेशिवाय पाणीपुरवठा, रस्ते, चौकांचे सुशोभीकरण, प्रशासनातील सकारात्मक बदल, कामांची गुणवत्ता या बाबींचा समावेश होता. त्याशिवाय पालिकेला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरील सर्व मुद्दयांचा विचार करून या पालिकेची निवड करण्यात आली.
आणखी प्रयत्न करू
या पुरस्कारासाठी पाणीपुरवठ्याची सुविधा हा निकष सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. पालिकेने जायकवाडी योजना पूर्ण केली आहे. शिवाय स्वच्छतेची कामे सुरू आहेत तर स्वच्छतेच्या बाबतीत आणखी कामे करायची आहे. पुरस्काराने मात्र पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वच्छतेसाठी आणखी प्रयत्न केले जातील.- बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना