आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेच्या जळत्या चितेवर टाकला अनोळखी मृतदेह!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील अमरधाम स्मशानभूमीत एका महिलेच्या जळत्या चितेवर अनोळखी युवकाचा मृतदेह टाकल्याचा भयंकर प्रकार शनिवारी सकाळी घडला. अंदाजे 30 वर्षे वयाच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटली नव्हती. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता विजेचा शॉक लागून 46 वर्षीय लता पूनमचंद चौधरी या महिलेचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी 9 वाजता राख सावडण्याचा कार्यक्रम होता. यानुसार सकाळी 7 वाजता नातेवाईक जमले. तेव्हा मृतदेहाचा काही भाग तसाच होता. नातेवाइकांनी पुन्हा सरण रचून अग्नी दिला. नातेवाईक घरी निघून गेले. त्यानंतर तासाभरातच याच चितेवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुणीतरी आणून टाकला. याची कुणकुण येथील सुरक्षा रक्षक रामदास हगारे यांना लागली. त्यांनी त्वरित चौधरी कुटुंबीयांना कळवले. नातेवाईकही पुन्हा स्मशानभूमीत दाखल झाले. तोवर पोलिसांचा फौजफाटाही स्मशानभूमीत दाखल झाला. अर्धवट जळालेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह चितेवरून काढण्यात आला.

मृत युवक गरीब कुटुंबातील असावा, अंत्यविधीसाठीसुद्धा पैसे नसावेत किंवा हा घातपातही असू शकतो, असे तर्कवितर्क लावले जात आहे. यामुळे पोलिसांना अजूनही तपासाची दिशा मिळालेली नाही. ओळख पटल्यानंतरच तपासाची प्रक्रिया पुढे सरकू शकते.

‘त्या’ युवकाचे वर्णन
तो मृत युवक अंदाजे 30 वर्षांचा असावा. त्याची प्रकृती मध्यम असून चेहरा लांबट आहे. फे्रंचकट दाढी ठेवलेली आहे. शिवाय डाव्या हातामध्ये रॉड असून हात जळाल्याने रॉड दिसून आला आहे.

व्हिसेरा व डीएनए चाचणी
सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी व्हिसेरा चाचणी औरंगाबादला केली जाणार आहे. ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.