आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रेल्वेस्थानकाचा चेहरा बदलणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - नेहमीच रिक्षांचा गराडा, अस्वच्छता आणि पाणीटंचाईचा सामना करणा-या जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक एस.एन.सोईन यांनी नुकताच जालना दौरा करून स्थानकावरील विविध सोईसुविधांची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी या परिसराचा विकास करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सोईन परत जाताच या भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. यात पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षांचा गराडा हटवून तेथे काँक्रिटीकरण केले जाणार आहे तसेच या परिसरात मध्यभागी असलेले विजेचे खांब हटवले जाणार आहेत. शिवाय संपूर्ण परिसरात संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
सध्या या भागात दोन्ही बाजूंनी वाहने आत येतात आणि बाहेर जातात, मात्र काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केले जाणार आहेत.
बाहेरील परिसराचा विकास करण्यासोबतच रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे. सध्या येथील प्लॅटफॉर्म केवळ 23 मीटर लांबीचा असून त्याची लांबी आणखी 50 मीटरने वाढवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीच्या काळातही रेल्वेत बसणे आणि उतरणे सोपे होणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. टाकी ते रेल्वेस्थानक अशी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून ते काम पूर्ण झाल्यानंतर येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या मार्गी लागणार आहे.