आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalna ZP CEO Issue And Irrigation Department Issue

चेक नंबर दिल्यामुळे टळली खुर्चीची जप्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- पाझर तलावासाठी संपादित जमिनीच्या वाढीव मावेजापोटी न्यायालयाच्या आदेशावरून झेडपीच्या सीईओंची चारचाकी गाडी व लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त करताच १ लाख १६ हजार ३४९ रुपयांसाठी चेक नंबर कॅफोंनी दिला.

शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता सुरू झालेली ही कार्यवाही ५ वाजेदरम्यान संपली. त्यानंतर जप्त केलेली गाडी व खुर्ची परत देण्यात आली.

शेतकरी भीमराव सोनाजी देशमुख (राजेगाव, ता. घनसावंगी) यांची गाव शिवारातील गट नं. १९७ मधील ३२ आर जमीन पाझर तलावासाठी वर्ष २००० मध्ये संपादित केली होती. वाढीव मावेजासाठी शेतकरी देशमुख यांनी अॅड. वाघ यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्याकडे अर्ज दाखल केला. यानुसार न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये व्याजासह १ लाख १६ हजार ३४९ रुपये मावेजा देण्याचे आदेश लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. मात्र, एक वर्ष होऊनही पैसे न दिल्यामुळे दिवाणी न्यायाधीश ए. अार. उबाळे यांनी गुरुवारी जप्तीचे आदेश काढले.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी बेलिफासह शेतकरी देशमुख व अॅड. वाघ यांनी लघु पाटबंधारे विभागात जाऊन कार्यकारी अभियंता वाय. पी. माकू यांची खुर्ची जप्त केली. तर सीईओ दीपक चौधरी यांचीही गाडी जप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माकू यांनी हा प्रकार तत्काळ सीईओंना सांगितला. त्यानंतर शेतकरी आणि अॅड. वाघ यांच्याशी चर्चा करून सीईओ चौधरी यांनी कॅफो जे. बी. चव्हाण यांना चेक नं. देण्याचे सांगितले. त्यानंतर शेष निधीअंतर्गत चेक नंबर देण्यात आला आणि जप्तीची नामुष्की टळली.