आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: नदीवर बांधले बंधारे, टंचाई सोसणाऱ्या जांबरखेड्यात घरोघरी पोहोचली गंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर (औरंगाबाद) - तालुक्यातील शिवना नदीकाठच्या जांबरखेडा येथे नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या उभारणीसाठी सरपंचाच्या अथक पाठपुराव्यामुळे कायम दुष्काळ आणि पाणीटंचाईची झळ सोसणारे जांबरखेडा गाव टँकरमुक्त झाले आहे. गावाला पिण्याच्या मुबलक पाण्याबरोबरच परिसरातील शेतशिवारही बारमाही बागायती झाले आहे.  
 
तालुक्यातून वाहणाऱ्या शिवना नदीकाठच्या जांबरखेडा गावात यापूर्वी पावसाळ्यानंतर पाणीटंचाईची समस्या कायम भेडसावत असे. शेजारच्या गावातून पायपीट करून नागरिकांना तहान भागवावी लागत होती. तर कधी सरकारी टँकरच्या फेऱ्यावर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. गावातील सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान निवृत्ती बारसे हे सुटीवर गावी आल्यानंतर गावाच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांची उजाड झालेली शेतीवाडी पाहून ते अस्वस्थ होत.

गावाचा सर्वंकष विकास करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या बारसे यांनी १९९१ मध्ये सीमा सुरक्षा दलातून त्यांनी स्वेच्छानिवृती घेत गाव गाठले. नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा होण्याच्या प्रकारामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर नदीपात्रातून वाळू उपसा रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठे जनआंदोलन उभे केले. वाळू तस्कराकडून धमक्या आदी प्रकारांना न जुमानता नदीतून वाळू उपसा रोखण्याचे  आंदोलन यशस्वी केले. त्यानंतर नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे दिवंगत अध्यक्ष विजयेंद्र काबरा यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विशेष बाब म्हणून २००२ मध्ये जांबरखेडा येथे कोल्हापुरी बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. १ कोटी ४१ लक्ष रुपये खर्चाच्या तरतुदीतून २००५ मध्ये बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले.  
 
नदीपात्रातून पावसाचे पाणी गावात बंधाऱ्यामुळे अडल्यामुळे गावावर कायम पाणीटंचाईचे निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर झाले. गावासह बाजूच्या गावांना बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली. परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्र कायम ओलिताखाली आले. पाण्याच्या मुबलकतेमुळे गावाची मोसंबी उत्पादक म्हणून तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.  

धरणावर कायम लक्ष
शासकीय निधीतून कोल्हापुरी बंधारा पूर्ण झाल्यानंतर सरपंच निवृत्ती बारसे यांनी बंधाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठीच्या कामाला वाहून घेतले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार त्यांनी कै. मच्छिंद्र पाटील सहकारी पाणी वापर संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ५९४.९५ दलघमी पाणी क्षमतेचे ३४ दरवाजे असलेल्या बंधाऱ्याची देखरेख केली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणाचे गेट बंद करण्याचे अवजड वजनाचे काम केले जाते. पूरपरिस्थिती उद्भवल्यास जीव धोक्यात घालून गेट खोलण्याचे काम करतात.  
 
पाणी चळवळीला ग्रामस्थांची साथ
गावाला टँकरमुक्त करून पाणीदार गावाचा चेहरामोहरा बहाल करणारे सरपंच निवृत्ती बारसे यांनी ग्रामस्थ पाणी अडवा चळवळीसाठी संघटित झाल्यामुळे गावाचा कायापालट झाला. पिण्याच्या पाण्याबरोबरच गावातील मोसमी पिकांचे उत्पादक म्हणून गावाची ओळख झाल्याचे त्यांनी सांगितले.  

दीड कोटी खर्चाच्या बंधाऱ्यामुळे दुष्काळी भागात ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली   
१००० गावाची लोकसंख्या
०३  हातपंप
०२ सार्वजनिक -विहिरी   
- विहिरीत मुबलक पाणी  
- पाणीपुरवठा योजना -२५ हजार लिटर साठवण क्षमता  
- गावाला नळ योजनेतून दररोज पाणीपुरवठा   
- दरवर्षी गावातून तीन हजार टन मोसंबीचे उत्पादन.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नळाला पाणी आल्‍याने महिला सुखावल्‍या...
बातम्या आणखी आहेत...