आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार: एड्सग्रस्तांच्या मुलांना जपानहून आर्थिक मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण (ता. कळंब)- जन्मदात्यांचा एड्समुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांनाही समाजाकडून उपेक्षितपणा व बहिष्कृतपणची वागणूक देण्यात येते. अशा मुलांचे संगोपन व संवर्धनाचे कार्य कोथळा (ता. कळंब) येथील आनंत किरण सेंटर फॉर एचआयव्ही चिल्ड्रन या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्याची दखल घेत जपान सरकारने संस्थेच्या इमारत बांधकामासाठी 55 लाख रुपयांची मदत दिली आहे. राज्य शासनाकडून मात्र या घटकाची उपेक्षाच सुरू आहे.

सन 2000 पासून या संस्थेचे काम सुरू असून सध्या या संस्थेमार्फत 39 मुलांचे संगोपन करण्यात येत आहे. समाजातील काही लोकांनी तारुण्यात बेजबाबदारपणे वागल्यामुळे त्यांना एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यांच्या या बेजबाबदार वर्तनाचे परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीसही भोगावे लागतात. एड्सचा बळी ठरल्यानंतर अशा व्यक्तींच्या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. परिणामी या मुलांच्या नशिबी अस्पृश्यतेचे जिणे येते. अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावरूनही केवळ कागदोपत्रीच घोषणा करण्यात येतात. प्रत्यक्षात उपाययोजना त्या प्रमाणात राबवण्यात येत नाहीत. कोथळ्याच्या ग्रामीण पुनर्रचना केंद्राचे अनंत किरण सेंटर फॉर एचआयव्ही चिल्ड्रन ही संस्था आशेचा किरण ठरली आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून 39 मुलामुलींचे संगोपन करण्यात येत आहे. कोथळा येथील मारुती ज्ञानोबा सिरसट यांनी सन 2000 मध्ये ग्रामीण पुनर्रचना संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक सचिव आहेत.

जपान सरकारमुळे संस्थेची सुसज्ज इमारत
प्रारंभी स्वत:च्या घरात सुरू केलेल्या या बालगृहासाठी सुसज्ज व स्वतंत्र इमारतीची आवश्यकता होती. त्याच्या पूर्ततेसाठी सिरसट यांनी प्रयत्न सुरू केले. सामाजिक कार्याची आवड असलेल्या सिरसट यांची विविध संस्थांशी ओळख होती. याचाच फायदा म्हणजे त्यांनी जपान सरकारच्या साहाय्याने संस्थेची सुसज्ज व स्वतंत्र इमारत उभी केली. या इमारतीसाठी जपान सरकारकडून 55 लाख रुपयांचा निधी मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

व्यापार्‍यांकडूनही मदत
या उपेक्षित बालकांसाठी समाजातील अनेक व्यापार्‍यांकडूनही मदत करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने कपडे, शालेय साहित्यांसारख्या विविध वस्तूंचा कळंब येथील व्यापारी मंडळाच्या वतीने पुरवठा करण्यात येतो, असे सिरसट यांनी सांगितले. या उपेक्षित मुलांसोबत संस्थेत विविध सण-उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे करण्यात येतात.

फराळ साहित्याचे वाटप
संस्थेमध्ये गुरुवारी (दि. 31 ऑक्टोबर) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे यांच्या वतीने दिवाळीसाठी लागणारे फराळाचे साहित्य व इतर उत्सव साहित्य संस्थेतील चिमुकल्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या वेळी दिनेश कावळे, सचिन तटाळे, योगेश उडगे, प्रदीप परदेशी यांची उपस्थिती होती.

मदतीमुळे इमारत उभी राहिली
जपान सरकारच्या मदतीमुळे संस्थेची इमारत उभा राहू शकली. समाजातीत इतर घटकांनीही या बालकांना प्रवाहात आणण्याचे काम करावे, जेणेकरून या मुलांच्या मनात बहिष्कृतपणाची भावना येणार नाही.
- मारुती सिरसट, कोथळा.