आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra: No Breakthrough In Dalit Family Murder

जवखेडे हत्याकांडाची डीआयजींकडे चौकशी; लातुरात मोर्चा हिंसक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - नगर जिल्ह्याच्या जवखेडे येथील दलितांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय बंद पाळून शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कचेरीकडे निघालेल्या मोर्चातील जमावाने दुकाने व वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. दरम्यान, या हत्याकांडाची डीआयजींमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच लातूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यातच शनिवारी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर चौकापासून घोषणा देत मोर्चा काढला. रस्त्यात विविध भागांतील तरुण त्यात सहभागी झाले. बर्‍याच व्यापार्‍यांनी आपली दुकाने उघडलीच नव्हती. दरम्यान, अचानक आक्रमक झालेल्या जमावाने दगडफेक केली. यात २० ते २५ चारचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. गांधी चौकातील एका डॉक्टरकडे आलेल्या पेशंटच्या दोन कारच्या काचा फोडण्यात आल्या. अशोक हाॅटेल चौकातही कार फोडण्यात आली. लातूर- औसा (एमएच १४-१८२१) बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. शिवाजी चौक, प्रकाशनगर, पाण्याची टाकी, औसा रोड येथे दगडफेकीमुळे व्यापार्‍यांचे नुकसान झाले. मिनी मार्केट भागात दुकानांवर दगडफेक झाली. एका दैनिकाच्या कार्यालयाच्याही काचा फुटल्या.

पंकजा, कांबळे आज जवखेडेत
हत्याकांडाचा तपास डीआयजी पदाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथकाकडून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पीडित जाधव कुटुंबाला आर्थिक मदत व पोलिस संरक्षण देण्यात येणार असून, मंत्रिमंडळातील सदस्य पंकजा मुंडे आणि दिलीप कांबळे हे मंत्री रविवारी जवखेड्याला भेट देणार आहेत.