आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्नावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मूग गिळून गप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- जायकवाडीला पाणी सोडण्याबाबतचा वाद अनेक महिन्यांपासून सुरू आहे; परंतु जायकवाडीला पाणी सोडण्याचा कायदेशीर अधिकार ज्याला आहे ते जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या वादावर मूग गिळून गप्प बसले आहे. मराठवाडा विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीने प्राधिकरणाला अँड. तळेकर यांच्यामार्फत 29 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी दिली.

जायकवाडीला पाणी सोडण्यावरून औरंगाबाद-अहमदनगर-नाशिक असा त्रिकोणी वाद सुरू आहे. या वादात तिन्ही जिल्ह्यांतील मंत्री पडले आहेत. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी जायकवाडीला 9.5 टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. या. रा. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2005 च्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यान्वये जायकवाडीला पाणी सोडण्याचा व खोर्‍यातील सर्व प्रकल्पांची पाणी पातळी समान करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही.

तो अधिकार केवळ प्राधिकरणाला आहे. पाणी सोडण्यावरून एवढा वाद सुरू असतानाही प्राधिकरण निमूटपणे शांत बसले आहे. या वादाबाबत कोणतीही प्रतिक्रिया किंवा कारवाई करीत नाही.

खरी जबाबदारी प्राधिकरणाची असताना प्राधिकरणाने अशी आलिप्ततावादी भूमिका घेणे योग्य नाही. त्यांची जबाबदारी असतानाही ते काहीच बोलत नसल्याने प्रतिष्ठानमार्फत त्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात प्राधिकरणाने काहीही भूमिका घेतली नाही, तर पाण्यासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे. वकिलामार्फत हे पत्र पाठवण्यात आले आहे. अद्याप या पत्रावर प्राधिकरणाकडून काहीही उत्तर आले नाही, असेही जाधव यांनी सांगितले.