आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचे पाणी सोडा, शेतकरी आक्रमक, मोर्चाचे रूपांतर झाले रास्ता रोकोत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडीचे पाणी आपेगाव, हिरडपुरी या बंधाऱ्यांत सोडण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पैठण बसस्थानकाच्या परिसरात शुक्रवारी दोन तास रास्ता रोको केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला.

आपेगाव-हिरडपुरी हे दोन्ही बंधारे कोरडे पडलेले असल्याने परिसरातील ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जायकवाडी धरणाचा पाणी साठा पुरसा असून दोन्ही बंधाऱ्यात पिण्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ४० गावांतील नागरिकांनी शुक्रवारी माेर्चा काढण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने बसस्थानक चौकात मोर्चा पोहोचला. परंतु, मोर्चाने शासन प्रशासनाला जाग येणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी माेर्चाचे रूपांतर रास्ता रोकोत करत तासभर घोषणाबाजी करून बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचा रेटा लावून धरला.

सध्याचे भाजप सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. जायकवाडीचे पाणी उद्योगाला दिले जाते. शिवाय पश्चिम महाराष्ट्रालाही दिले जाते. मागील वर्षी जायकवाडीत कमी पाणीसाठा असतानाही पाणी सोडले गेले होते. यंदा मुबलक साठा असूनही दोन्ही बंधाऱ्यांत हक्काचे पाणी का सोडले जात नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होता.

येत्या आठ दिवसांत पाणी सोडले नाही, तर या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील या वेळी शेतकऱ्यांनी दिला. या रास्ता रोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश बोरूनकर, जयाजी सूर्यवंशी, आप्पा गारडे, जीवन चौधरी, गंगाधर खरात, शिवाजी गिरगे, सोमनाथ बांगर, देविदास चिंधे, संपत तळपे, राहुल जाधव, किशोर दसपुते, बद्रीनाथ पठाडे, हिरालाल बांगर यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी या वेळी संताप व्यक्त करत पैठण येथील तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सादर केले.

बसस्थानक चौकात पोलिस-आंदोलकांत बाचाबाची
दोन्ही बंधाऱ्यांत जायकवाडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. दरम्यान, आज मोर्चाचे रूपांतर अचानक बसस्थानक चौकात रास्ता रोकोत झाल्याने पैठण शहर पोलिसांची धांदल उडाली. यासाठी तातडीने एमआयडीसी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांची बाचाबाची झाल्याचे पाहावयास मिळाले.