आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वारीला सोन्याचे दिवस, क्विंटलला तीन हजार भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे आधीच उत्पादन कमी झालेले असताना यंदा रब्बी ज्वारीची आशाही मावळण्याच्या मार्गावर आहे. येथील मोंढ्यात ज्वारीने चांगलाच भाव खाल्ला असून क्विंटलला तीन हजारांचा भाव मिळाल्याने आगामी काळात ज्वारीची पाऊले महागाईकडे सरकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बाजारात एक ओळा सोन्याला तीन हजारापर्यंत रक्कम मोजावी लागते. तर एक क्विंटल ज्वारीला तीन हजारांचा भाव मिळाल्याने ज्वारीला सोन्याचे दिवस आले आहेत.

बीड येथील मोढ्यात दिवाळीआधी गावरान ज्वारीमध्ये सहाशे रुपयांची तेजी आली. त्यामुळे १५०० ते १६०० रुपयांवरून भाव २३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. मागील आठवडाभरात बाजारात ज्वारीची ३०० क्विंटल आवक झाली. मागणी वाढल्याने उपलब्धता कमी असल्याने मशीन क्लीन जूट ज्वारीचे तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे व्यवहार झाले. तर बिअर, पशुखाद्यासाठी लागणाऱ्या ज्वारीचे भाव १४०० ते १५०० रुपये क्विंटल राहिले. मागील आठवड्यात सोयाबीनची १२०० क्विंटल आवक झाली. भाव ३७८० रुपये होते. बाजरीला ऊसतोड मजुरांकडून मागणी होती. बाजरीचे भाव १५०० ते १७०० रुपये क्विंटल होते. तूर, हरभरा, उडदाची आवक ५० क्विंटलइतकी कमी होती. एकूण आवक ७५ टक्के घटल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. दिवाळीच्या आधी नंतर बाजारात धान्याची आवक नाममात्रच राहिली.

पावसावरच आशा मालदांडीला २३०० चा भाव
माजलगावच्या मोंढ्यात मालदांडी ज्वारीचे भाव क्विंटलमागे २२०० ते २३०० रुपये होते. पाऊस झाला तरच रब्बी ज्वारीचे पीक चांगले येईल, असे आडत व्यापारी माउली सुरवसे यांनी सांगितले. तर गेवराईच्या बाजारात मागील आठवड्यात शाळू ज्वारीची आवक एक हजार क्विंटल झाली. भाव १५०० ते २४०० रुपये राहिले. पावसावरच ज्वारीचे भाव अवलंबून असल्याचे आडत व्यापारी अजित काला म्हणाले.
व्यापारी टाळताहेत साठवणूक
काही वर्षांत ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट होत गेली. त्यामुळे बाजारात गहू ज्वारीचे भाव सारखेच होते. या वर्षी खरिपात पावसाने दगा दिल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र दुपटीने वाढले, परंतु पावसाअभावी अडचणीच आहेत. दुष्काळामुळे शेतकरी ज्वारी बाजारात विक्रीसाठी आणता खाण्यासाठी घरीच ठेवून आहेत. तर ज्या खरेदीदारांकडे ज्वारीचा साठा आहे. त्यांना लाभ होत असला तरी पीठ होत असल्याने साठवणूक टाळली जाते.

>यंदा ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्के घट होईल, असा अंदाज आतापासूनच लावला जात आहे. पाऊस झाला तरच ज्वारीची आशा आहे.
-किसनराव नाईकवाडे, आडतव्यापारी

३५०० रुपयांपर्यंत भाव चढतील
बीड, उस्मानाबाद, भूम, परांडा, सोलापूर, करमाळा, मोहोळ, बार्शी आदी भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. तेथील बाजारपेठा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जूट (दुधाळ रंग) ज्वारीचे भाव १८०० ते २००० रुपये होते. तुलनेने यंदा पाचशे ते सातशे रुपयांची तेजी आली आहे. आवक कमी असल्याने नवे पीक हाती येईपर्यंत ज्वारीचे भाव ३५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यापारी विष्णूदास बियाणी यांनी व्यक्त केला.