आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाने झाला आजार; उपचारास मुख्यमंत्री कक्षाचाही नकार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - भोपाळ, पंजाब, गुजरात या ठिकाणच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळणाऱ्या मंठा तालुक्यातील हिवरखेडा येथील माधव चव्हाण या युवकाने चमकदार खेळी करून मराठवाड्याचे नाव देशभरात झळकवले. परंतु, कबड्डीतून त्याच्या गुडघ्यात गॅप पडला आहे. याचे ऑपरेशन मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याची फाइलही मंजूर झाली होती. खेळाडू मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे सचिव यांना भेटून उपचार करण्याची वेळ घेण्यास गेले असता त्यांनी नुकतेच नियम बदलले असल्याचे सांगितले. या उत्तरामुळे माधव चव्हाण हा युवक हताश झाला असून, ‘राज्य पातळीवर कबड्डी खेळून झाला आजार; उपचार करण्यास मुख्यमंत्री कक्षाचाही नकार’ अशीच परिस्थिती त्यांच्या समोर उभी आहे.

मराठवाड्यातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत माधव चव्हाण याची एकमेव निवड झाली होती. या निवडीनंतर २०११ ते २०१३ या तीन वर्षांत राज्यस्तरीय संघात खेळून चांगली कामगिरी केली. परंतु, त्याच्या गुडघ्याला त्रास सुरू झाल्यामुळे वर्षभरापासून त्याने कबड्डी खेळणे बंद केले आहे. घरची परिस्थिती जेमतेमच असल्यामुळे त्याने गुडघ्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्ज केला होता. यासाठीही त्याला मुंबई येथे जाऊन दोन महिन्यांपासून चकरा माराव्या लागल्या. उपचार करण्याची कशीबशी फाइल मंजूर झाली. याबाबतचा मोबाइलवर मेसेजही आला. दरम्यान, उपचारासाठीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील सचिव ओमप्रकाश शेटे यांना चव्हाण भेटले असता, या आजाराचे उपचार आता बंद झाल्याचे कारण सांगितले.उपचारासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येणार असल्यामुळे कसा उपचार करणार, असा प्रश्न या खेळाडूसमोर उभा आहे.

वडील नाहीत, भाऊही अपंग
कबड्डीत चमकदार कामगिरी करून जालनेकरांची मान उंचावणाऱ्या माधव चव्हाण या खेळाडूला मोठा भाऊ असून, तोही पायाने अपंग आहे. तर २०१० मध्ये या वर्षात वडीलही वारले आहेत. यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

उपचारासाठी धडपड
मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारासाठी दोन महिन्यांपासून वारंवार चकरा मारल्या. उपचार फाइल मंजूर झाल्याचाही मोबाइलवर मेसेजही आला. परंतु, कक्ष सचिवाने अचानकपणे या आजाराचे उपचार बंद झाल्याचे सांगण्यात आल्यामुळे मानसिक ताण आला आहे. - माधव मणीराम चव्हाण, कबड्डी खेळाडू, जालना.
बातम्या आणखी आहेत...