लातूर- शहर युवक काँग्रेस आयच्या सचिव अँड. कल्पना गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी कल्पनाचे वडील मंगल गिरी यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी अशाच मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांना दिले आहे. या मुख्य मागणीसह अन्य मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
21 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करावे, या प्रकरणात सरकारी वकील उज्जवल निकम यांना नियुक्त करावे, जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जावा, हत्याकांडातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी आदी मागण्या आमदार गोर्हे यांनी केल्या आहेत. कल्पना यांचे वडील मंगल गिरी यांनी कोणत्याही आरोपीची जमानत घेऊ नये, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, खटल्याचा निकाल लागेपर्यंत गिरी कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, सर्व आरोपींची नोर्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या निवेदनात आमदार गोर्हे यांनी केलेल्या मागण्यांचाही समावेश आहे. आपल्या व आपल्या परिवाराच्या जिवास धोका झाल्यास या प्रकरणात अटक असलेले, फरार असलेले आरोपी व लातूर काँग्रेस आय पार्टीस जबाबदार धरावे, असे गिरी यांनी म्हटले आहे.